लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षांतील नेत्यांकडून तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी ईडी, सीबीआयच्या केलेल्या आरोपाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.
ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सरकारवर करण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षातील २५ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील खटले रद्द केले जातात, असे विरोधी पक्षाचे आरोप आहेत. याबाबत एका वृत्तपत्राचे विश्लेषणही आहे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला. यावर नरेंद्र मोदी म्हणाले, “पहिली एक गोष्ट म्हणजे यातील एकही केस रद्द केलेली नाही. न्यायालय जो निर्णय घेईल तो घेईल. न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. दुसरे म्हणजे, अशी किती प्रकरणे राजकारणाशी संबंधित आहेत? फक्त ३ टक्के. ९७ टक्क्यांमध्ये मोठमोठे नोकरशहाही तुरुंगात आहेत”, असे मोदींनी स्पष्ट केले. ते ‘नेटवर्क18’च्या मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा : “आमच्या पूर्वजांनी पापं केली असतील म्हणून…”, नरेंद्र मोदी आरक्षणावर नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “मग या तपास यंत्रणा का निर्माण केल्या गेल्या आहेत? जर या तपास यंत्रणा एखाद्या उद्देशाने स्थापन केल्या गेल्या असतील तर त्या उद्देशाची पूर्तता त्या करणार नाहीत का? आपली न्यायालये सर्वोच्च आहेत. न्यायालयेदेखील यासंदर्भात चौकशी करतात. खरे तर भ्रष्टाचाराचा मुद्दा एवढ्या हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. यावर चर्चा होण्याचीदेखील गरज आहे. एक काळ असा होता, फक्त आरोप झाला तरी धक्का बसायचा. आज दोषी ठरल्यानंतरही काही लोक हात ओवाळत फोटो काढतात. मग ते भ्रष्टाचाराचा गौरव करत आहेत, अशी टीका त्याच्यावर व्हायला पाहिजे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“भ्रष्टाचाराला हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. अन्यथा देशाचे मोठे नुकसान होईल. भाजपा विरुद्ध बोलत आहेत म्हणून नाही तर मला असे दिसते आहे की, हळूहळू एक वातावरण तयार होत आहे. भ्रष्टाचारामुळे गरीब लोक मरत आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. समाजालाही याबाबत जागरूक करण्याची गरज आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.