सध्या देशभरात पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची चर्चा आहे. अवघ्या काही महिन्यांत देशभरात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारंसहिता लागू होईल. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर टीका केली जात आहे. संसदेतील खासदारांचं निलंबन, कायदे पारित करण्याचा वेग यावरून काँग्रेस पक्षानं मोदी सरकारवर परखड टीका केली जात आहे. त्यातच आता २०२४ च्या निवडणुकांनंतर मोदी सरकार देशाची राज्यघटनाच बदलणार असल्याचेही दावे केले जात असून त्यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण दिलं आहे. ब्रिटिश वर्तमानपत्र फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
२०२४ च्या निवडणुका जिंकण्याचा विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “लोकांना हे समजलं आहे की आता देश मोठी भरारी घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल, याविषयी मला पूर्ण खात्री आहे. लोकांना ही भरारी घ्यायची आहे. आणि कोणत्या पक्षानं देशाला इथपर्यंत मजल मारून दिली याचीही लोकांना पूर्ण कल्पना आहे”, असंही मोदी म्हणाले. “देशातील सामान्य माणसाच्या आयुष्यात मोदी सरकारने मोठा बदल घडवू आणला असून १० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या अपेक्षा आणि आजच्या त्यांच्या अपेक्षा यात जमीन-आस्मानाचा फरक आहे”, असंही मोदींनी नमूद केलं.
“ही टीका म्हणजे भारताच्या नागरिकांचा अपमान”
दरम्यान, देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना मोदींनी यातून देशाच्या नागरिकांचाच अवमान होत असल्याचा दावा केला आहे. “विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. पण या सगळ्या आरोपांची समस्या ही आहे की लोकशाही धोक्यात आल्याचे दावे करणं म्हणजे फक्त देशातील नागरिकांच्या बौद्धिक कौशल्याचा अपमान नसून त्यांच्या लोकशाहीप्रती असलेल्या बांधिलकीलाही दुय्यम ठरवण्यासारखा हा प्रकार आहे”, असं मोदी आपल्या उत्तरात म्हणाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ च्या निवडणुकांनंतर भाजपा देशाची राज्यघटना बदलणार असल्याचे दावे फेटाळून लावले. “हे सर्व दावे निरर्थक आहेत”, असं मोदी म्हणाले. “आमच्या सरकारने देशात राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानपासून देशातील १ बिलियन लोकसंख्येला डिजिटल विश्वाशी जोडण्यापर्यंतच्या योजना या राज्यघटना बदलून नव्हे, तर लोकांच्या सहभागातून साध्य करून दाखवल्या आहेत”, असंही मोदींनी नमूद केलं आहे.
अमेरिकेच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका शीख फुटीरतावादी व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा अमेरिका प्रशासनाने केला. ही व्यक्ती म्हणजे खलिस्तानी समर्थक गुरपतवंतसिंग पन्नू होता, असंही सांगितलं जात आहे. या कटामध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आल्यानंतर भारताच्या भूमिकेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. यावर उत्तर देताना, “कुणी यासंदर्भातले पुरावे सादर केले, तर आम्ही नक्कीच त्यात लक्ष घालू”, असं मोदी या मुलाखतीत म्हणाले आहेत.