PM Narendra Modi Interview: लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार असून त्याच्या निमंत्रणावरूनही राजकारण होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. देशातील बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांवर त्यांनी टिप्पणी केली. तसेच, त्यांच्या कामाच्या पद्धतीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

देशातील महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांकडून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर मोदींनी या मुलाखतीमध्ये भूमिका मांडली. “आपण थोडा वेळ यावर होणारे आरोप बाजूला ठेवुयात आणि तथ्यांवर बोलू. या काळात दोन वर्षं न भूतो न भविष्यती असं करोनाचं संकट उद्भवलं होतं. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली होती. अनेक देशांमध्ये मंदीसदृश्य परिस्थिती होती. मात्र तरीही भारतानं या संकटाशी उल्लेखनीय ठरावा असा सामना केला आणि आपली पत राखली”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“…म्हणून मी कठीण काम हाताळू शकतो”

दरम्यान, त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत त्यांना विचारणा केली असता आपण कठीण निर्णय घेण्यासाठी कायम तयार असतो, असं मोदींनी नमूद केलं. “लोण्याच्या गोळ्यावर कुणीही रेघ काढू शकतं. पण जर काढायचीच असेल तर दगडावर रेघ काढा. एखादं काम कठीण आहे म्हणून काय झालं. सुरुवात तर करा. माझा यावर विश्वास आहे. त्यामुळेच मला कठीण काम हाताळण्याचा आत्मविश्वास मिळतो”, असं मोदींनी नमूद केलं.

यावेळी गेल्या वर्षभरात आपल्या कामगिरीचं मूल्यांकन कसं करणार? अशी विचारणा मुलाखतीमध्ये पंतप्रधानांना करण्यात आली. त्यावेळी एखादी गोष्ट सुरू करतानाच तिचा शेवट काय होईल, हे मला माहिती असतं, असं सूचक विधान मोदींनी केलं. “गेल्या एका वर्षावरून माझ्या एकूण कामगिरीचा योग्य अंदाज येणं अशक्य आहे. कारण माझा दृष्टीकोन व योजना या टप्प्याटप्प्याने विकसित होत असतात. जेव्हा मी एखादी गोष्ट सुरू करतो, तेव्हा मला तिचा शेवटही माहिती असतो. पण मी कधीच तो आधी जाहीर करत नाही. सुरुवातीलाच मी ब्लूप्रिंट देत नही”, असं मोदी म्हणाले.

PM Modi Interview: बेरोजगारी, महागाईच्या समस्येचं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

“मी एखाद्या चित्रकाराप्रमाणे काम करतो”

“या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही आज जे पाहात आहात, ते योजनांचं अंतिम फलित नाही. यापेक्षा खूप मोठं वास्तव सगळ्यात शेवटी प्रत्यक्षात उतरेल. मी नेहमीच मोठ्या स्तरावर काम करतो. एखाद्या चित्रकाराप्रमाणे मी एका बिंदूपासून सुरुवात करतो. पण त्या वेळी शेवटी अस्तित्वात येणारं चित्र दिसत नाही”, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या कामाच्या बाबतीत भाष्ट केलं.

“ही माझ्या कामाची पद्धत आहे. जेव्हा भारत मंडपमचं काम सुरू झालं, तेव्हा कुणीही असा विचार केला नव्हता की तिथे जी-२० परिषद होईल. पण मी काहीतरी नियोजन डोक्यात ठेवून काम करत होतो”, असंही मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi interview speaks on working style indian politics pmw