पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय स्तरावर एकीकडे भाजपाप्रणीत एनडीए तर दुसरीकडे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. त्यातच विरोधकांनी आपल्या सभा व जाहीर भाषणांमधून मोदी सरकारवर सातत्याने टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परखड सवाल केले असून त्यासंदर्भात मोदींच्या उत्तराची अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होत. त्यावर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका मांडली आहे.
या मुलाखतीमध्ये मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात भारतातील वेगवेगळ्या समस्यांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. भाजपाकडून हे सारे आरोप वेळोवेळी फेटाळण्यात आले असले, तरी मोदींनी अद्याप यावर जाहीरपणे भाष्य केलेलं नव्हतं. आता या मुलाखतीच्या निमित्ताने मोदींनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
मोदींनी यावेळी महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “आपण थोडा वेळ यावर होणारे आरोप बाजूला ठेवुयात आणि तथ्यांवर बोलू. या काळात दोन वर्षं न भूतो न भविष्यती असं करोनाचं संकट उद्भवलं होतं. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली होती. अनेक देशांमध्ये मंदीसदृश्य परिस्थिती होती. मात्र तरीही भारतानं या संकटाशी उल्लेखनीय ठरावा असा सामना केला आणि आपली पत राखली”, असं मोदी यावेळी म्हणाले.
“जागतिक पातळीवरचं संकट, गंभीर आव्हानं, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, भौगोलिक व राजकीय स्तरावर निर्माण झालेले वाद यामुळे जगभरात मूलभूत गरजेच्या गोष्टींच्या किमतीही वाढल्या होत्या. २०१४-१५ ते २०२३-२४ या काळातली सरासरी महागाई ५.१ टक्के होती. २००४ ते २०१४ या काळात हीच महागाई ८.२ टक्क्यांवर होती. मग यापैकी कोणता महागाईचा दर जास्त आहे?” असा सवाल नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत केला.
भाजपा नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदी का निवडते? पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी आमदार नसताना..”
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये देशातील महागाईचा दर ४.८ होता, तर नोव्हेंबरमध्ये हाच दर ५.८ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशातल्या बेरोजगारीचं काय?
बेरोजगारी व अपुऱ्या नोकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, “हे सर्वश्रुतच आहे की पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा सकारात्मक परिणाम देशाच्या विकासदर वाढीवर आणि रोजगारावर होतो. त्यामुळे आम्ही पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. २०१३-१४ साली या क्षेत्रात १.९ लाख कोटी रुपये गुंतवणूक होती. ती २०२३-२४ साली वाढून १० लाख कोटींवर पोहोचली आहे”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला.
“देशात पायाभूत सुविधांचे प्रकल्प कधी नव्हे इतक्या वेगाने उभे राहात आहेत. प्रत्येक क्षेत्रात १० वर्षांपूर्वी आपण जशी प्रगती करत होतो त्यापेक्षा कित्येक पटींनी चांगली कामगिरी आपण आत्ता करत आहोत”, असंही मोदी म्हणाले.