काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद कौशल्याचे कौतुक केले आहे. मात्र त्या तुलनेत मोदींकडून अजून कृती झालेली नाही याकडेही लक्ष वेधले आहे.
 गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुसंख्य भारतीय मतदारांनी त्यांना एक कृतिशील नेता समजून मते दिली होती. मात्र बोलण्याच्या तुलनेत मोदींकडून अद्याप पुरेसे काम झालेले दिसत नाही आणि भारतीय जनता पक्ष केवळ हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटत असल्याचेही थरूर यांनी म्हटले आहे.
मोदी भाषणे चांगली देतात, घोषवाक्ये चांगली तयार करतात, त्यांचे संवाद कौशल्य उत्तम आहे. पण त्या प्रमाणात त्यांनी अद्याप काम करून दाखवलेले नाही, असे थरूर म्हणाले. भाजप आणि मोदींना केवळ वल्गना करून भागणार नाही तर त्यांनी विकास कामेही करून दाखवली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
थरूर यांचे ‘इंडिया शास्त्र – रिफ्लेक्शन्स ऑन द नेशन इन अवर टाइम’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यावर ते म्हणाले की गेल्या निवडणुकीत भाजप जर इतक्या बहुमताने निवडून आला नसता तर त्यांनी हे पुस्तक इतक्या लवकर लिहिले नसते. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या इंडिया- फ्रॉम मिडनाइट टू मिलेनियम या पुस्तकात देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतरचे त्यांचे द एलिफंट, द टायगर अँड द सेलफोन हे पुस्तक स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्धापन वर्षांत प्रकाशित झाले. तर या मालिकेतील पुढील पुस्तक स्वातंत्र्याला ७० किंवा ८० वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिले असते. मात्र भाजपच्या इतक्या देदीप्यमान विजयामुळे आणि मोदींच्या उदयामुळे ते लवकर लिहिले, असे ते म्हणाले.  गेल्या काही दिवसांत थरूर यांनी काँग्रेसजनांचा रोष ओढवून घेऊनही मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. मात्र आपण भाजप प्रवेशास उत्सुक आहोत या अफवांना त्यांनी दूर लोटले. आपण कायम काँग्रेसमध्येच राहू, असे स्पष्ट केले.

Story img Loader