बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये लालूप्रसाद यादव यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कडाडून टीका केली. लालूप्रसाद यादव म्हणाले सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण त्यांच्याकडे कुठलंही घराणं नाही. तसंच नितीशकुमार हे पलटूराम आहेत अशीही टीका लालूप्रसाद यादव यांनी केली.
नितीशकुमार पलटूराम
“नितीशकुमार पहिल्यांदा एनडीएबरोबर गेले तेव्हा आम्ही त्यांना कुठलीही दुषणं दिली नव्हती किंवा शिव्या दिल्या नव्हत्या. आत्ताही शिव्या दिल्या नाहीत. आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की ते पलटूराम आहेत. त्यामुळे त्यावेळी त्यांनी पलटी मारली होती. आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांनी दुसऱ्यांदा आपण पलटूराम आहोत हेच दाखवून दिलं आणि नरेंद्र मोदींच्या पायाशी जाऊन बसले.” असं म्हणत नितीशकुमार यांच्यावरही लालूप्रसाद यादव यांनी टीका केली.
हे पण वाचा- नितीश कुमार म्हणाले, “आता मी फक्त तुमच्याबरोबरच”; पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र हसू आवरेना
नितीशकुमारांना लाज वाटत नाही का?
लालूप्रसाद यादव पुढे म्हणाले, “मी टीव्हीवर पाहतो कुणी फुलं देतं, कुणी माळा घालतं.. हे सगळं पाहून नितीश कुमारांना लाज वाटत नाही का? ” असाही प्रश्न लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या भाषणात विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आजकाल घराणेशाहीवर फार बोलताना दिसतात. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत. तसंच त्यांच्याकडे कुटुंबही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं निधन झालं. तरीही त्यांनी क्षौर केलं नाही. हिंदू धर्मात आईचं किंवा वडिलांचं निधन झालं तर दाढी-मिशा आणि केस काढून क्षौर केलं जातं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातलं काहीही केलं नाही. त्यामुळे ते हिंदू नाहीत. राम रहिमच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तिरस्कार पसरवण्याचं काम करत आहेत.” असं म्हणत लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली.