Nawaz Sharif Recalls PM Modi Lahore Visit: पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO च्या शिखर परिषदेसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी १६ ऑक्टोबर रोजी इस्लामाबाद, पाकिस्तानला भेट दिली. या भेटीनंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पाकिस्तानात आले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या २०१५ सालच्या दौऱ्याचा उल्लेख केला. त्या दौऱ्यात मोदींनी अचानक पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावरून भारतातून विरोधी पक्षांनी टीकाही केली होती. मात्र आता पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांनी त्या दौऱ्याची आठवण काढली असून मोदींच्या येण्यामुळे आम्हाला आनंद झाला असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले नवाझ शरीफ?
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी इंडिया टुडे वृत्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात म्हटले की, एस. जयशंकर यांच्यासह जर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. २०१५ साली त्यांनी जेव्हा शेवटचा दौरा केला होता, त्याच्या आठवणी आजही आमच्या मनात ताज्या आहेत. त्यांनी माझ्या आईशी संवाद साधला होता. या दौऱ्याची आठवण करून देत नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला आहे. मागच्या ७५ वर्षात जे झाले, ते विसरून जाऊ आणि पुढच्या ७५ वर्षांचा विचार करून एकत्र येऊ, असे आवाहन त्यांनी केले आहे.
२०१५ रोजी काय झाले होते?
२५ डिसेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा आटपून भारतात दिल्लीकडे येत असताना ते वाट वाकडी करून थेट पाकिस्तानला गेले. दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी त्यांचे विमान लाहोरच्या अल्लामा इकबाल विमानतळावर उतरले. या दौरा पूर्वनियोजित नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी अचानक पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी दहा वर्षात एकही पंतप्रधान पाकिस्तानात गेलेला नव्हता. पंतप्रधान मोदी येत आहेत, हे कळल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ हेदेखील शिष्टाचार मोडून थेट विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी पोहोचले होते.
योगायोगाने २५ डिसेंबर हा नवाझ शरीफ यांचा वाढदिवसही असतो. त्यामुळे या दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. तसेच याचदिवशी नवाझ शरीफ यांच्या नातीचे लग्न होते. या लग्नातही पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. तब्बल अडीच तास मोदी पाकिस्तानात होते. त्यापैकी एक तास त्यांनी नवाझ शरीफ यांच्या घरात घालवला होता.
यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवरून नवाझ शरीफ यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ते म्हणाले, शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियासह आजची संध्याकाळ घालवली. नवाझ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीचे लग्न योगायोगाने आजच असल्यामुळे त्यांच्यासाठी मोठा आनंदाचा दिवस होता. या दौऱ्याच्या काही दिवस आधाची उभय नेत्यांनी पॅरिस येथे हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेल्या परिषदेत भेट घेतली होती.
अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर पाकिस्तानात जाणारे दुसरे पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या आधी २००४ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. दोन्ही देशांमध्ये संवाद प्रस्थापित होऊन सकारात्मक संबंध असावेत, यासाठी अटल बिहारी वाजपेयी प्रयत्नशील होते.