सौरऊर्जा आणि शास्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ फेब्रुवारी) ‘पंतप्रधान सूर्य घर-मोफत वीज योजने’ची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत साधारण १ कोटी घरांपर्यंत वीज घेऊन जाण्याचे तसेच प्रतिमहिना ३०० यूनिट्सपर्यंतची वीज मोफत देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार या योजनेसाठी साधार ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. “शास्वत विकास आणि लोककल्याणासाठी आम्ही पीएम सूर्य घर-मोफत वीज योजना सुरू करत आहोत. या प्रकल्पासाठी ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून साधारण १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० यूनिट्स मोफत वीज मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे,” असे मोदी म्हणाले.
योजनेचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन
ही योजना सामान्य लोकांपर्यंत जावी, या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार व्हावा यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायती यांनी रुफटॉप सोलार सिस्टिम बसवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
नोंदणी करण्याचे मोदींचे आवाहन
“या योजनेमुळे रोजगारनिर्मिती होईल तसेच कमी वीजबील येईल. चला सौरउर्जा आणि शास्वत विकासाला चालना देऊ. मी सर्व ग्राहकांना विशेषत: तरुणांना आवाहन करतो की त्यांनी पंतप्रधान सूर्य घर-मोफत वीज योजनेला आणखी बळकट करावे. त्यांनी https://pmsuryaghar.gov.in या लिंकला भेट देऊन आपली नोंदणी करावी,” असे आवाहनही मोदी यांनी केले.