पीटीआय, वाराणसी
सत्तेची लालसा असलेले लोक केवळ आपल्या कुटुंबाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतात तर आमचे सरकार सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यावर काम करते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. वाराणसी येथे ३८८० कोटी रुपयांच्या ४४ प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर एका सभेला ते संबोधित करीत होते. वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे.
देश सेवेचा आमचा मार्गदर्शक मंत्र नेहमीच ‘सबका साथ, सबका विकास’ राहिला आहे. या भावनेने आम्ही प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी पुढे जात राहू. याउलट ज्यांना सत्तेची लालसा आहे ते रात्रंदिवस राजकीय खेळ खेळतात आणि त्यांचा भर फक्त कुटुंबकेंद्रित विकासावर असतो, असे पंतप्रधान म्हणाले.
पूर्वी पूर्वांचलमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव होता, पण आज काशी या प्रदेशाची आरोग्य राजधानी बनत आहे,, असे पंतप्रधान म्हणाले. १०-११ वर्षांपूर्वी या प्रदेशात उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या असे सांगतानाच आजघडीला येथे अनेक मोठ्या रुग्णालयांच्या शाखा सुरू झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. दिल्ली आणि मुंबईची प्रमुख रुग्णालये आता केवळ या भागातील लोकांसाठीच उपलब्ध झाली नाहीत, तर रुग्णांसाठी सोयीही सुनिश्चित झाल्या असल्याचे ते म्हणाले.
विमातनळावर उतरताच अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश
पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी वाराणसीच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी विमानतळावरच आपल्या लोकसभा मतदारसंघात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले. उत्तर प्रदेश सरकारच्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
हे प्रकरण २३ जणांनी १९ वर्षीय मुलीवर केलेल्या कथित सामूहिक बलात्काराशी संबंधित आहे.
काशीने नेहमीच आपला वारसा जपला आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे. आज काशी प्राचीन तर आहेच, पण प्रगतिशीलही आहे. काशी पूर्वांचलच्या विकासाचा रथही ओढत आहे. आज भारत विकास आणि वारसा दोन्ही घेऊन पुढे जात आहे आणि आपली काशी त्याचे सर्वोत्तम मॉडेल बनत आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान