PM Narendra Modi letter to Sunita Williams : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) तब्बल नऊ महिने राहिल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता लवकरच पृथ्वीवर पोहोचणार आहेत. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ प्रवास फक्त ८ दिवसांसाठी होता. पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा मुक्काम वाढला होता. त्यानंतर आता स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे परतीचा प्रवास करत आहेत आणि ते लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत.

दरम्यान, अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर भारतात येण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचं आमंत्रण दिलं आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. “तुम्ही दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या जवळ आहात”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

मोदींनी पत्रात म्हटलं की, “मी तुम्हाला भारतीयांच्यावतीने शुभेच्छा देतो. आज मी प्रसिद्ध अंतराळवीर माईक मॅसिमो यांना एका कार्यक्रमात भेटलो. या संभाषणादरम्यान तुमचे नाव समोर आले आणि आम्ही तुमच्या कामाचा आम्हाला किती अभिमान आहे, यावर चर्चा केली. या चर्चेनंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून रोखू शकलो नाही. तसेच मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा माजी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना त्यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भेटलो, तेव्हा मी नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल विचारलं होतं. भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो”, असं मोदींनी म्हटलं आहे.

“तुमची प्रेरणादायी जिद्द आणि परिश्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर आम्ही तुमचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. यजमानपद भूषवणं ही भारतासाठी अभिमानाची बाब असेल. तुम्हाला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा”, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर शेअर केलेल्या पत्रात नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे.

Story img Loader