PM Modi Lex Fridman Podcast : अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा पॉडकास्ट आज प्रसारित झाला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच भारत-चीन, भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सुधारण्याच्या संदर्भातही भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीका केली. ‘आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला’, असं मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, आम्हाला प्रत्येकवेळी शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला”, असं स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या आपल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तसेच जागतिक स्तरावर शांततेसाठी भारताची वचनबद्धता कायम असल्याचं अधोरेखित केलं.

पंतप्रधान मोदींनी २०१४ मधील एका घटनेचाीही उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “२०१४ मध्ये शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केलं होतं. आशा होती की ते भारत-पाकिस्तान संबंधांसाठी एक नवीन सुरुवात करू शकतील. पण तसं झालं नाही. दरम्यान, पाकिस्तानचे लोकही हिंसाचार, अशांतता आणि दहशतीला कंटाळले असून त्यांनाही शांतता हवी आहे”, असं मोदींनी म्हटलं.

तसेच आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना मोदींनी म्हटलं की, “हे एक अनोख राजनैतिक पाऊल होतं. त्यावेळी ज्यांनी माझ्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं. तेव्हा प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात या याबाबत कौतुक केलं होतं”, असंही ते म्हणाले.

२००२ च्या गुजरात दंगलीबाबत मोदी काय म्हणाले?

२००२ च्या गुजरात दंगलींकडे कसे पाहता? असं विचारलं असता मोदी म्हणाले की, “२००२ च्या दंगली भोवतीच्या चर्चेला खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार होत होता. २००२ पूर्वी देशात सतत दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेचे वातावरण होते, त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हा जगातही दहशतवादी कारवायांमध्येही वाढ दिसून आली होती. १९९९ मध्ये कंधार अपहरण प्रकरण झालं होतं, २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला झाला होता आणि २००१ मध्ये आपल्या संसदेवर हल्ला झाला होता. तो काळ मोठ्या आव्हानांचा होता. पण २००२ नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

“२००२ ची आतापर्यंतची मोठी दंगली होती ही धारणा चुकीची आहे. वास्तविकता अशी आहे की २००२ पूर्वी गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. तरीही २००२ प्रमाणे त्या कधीही आंतरराष्ट्रीय बातम्या बनल्या नाहीत. तेव्हा आमच्या सरकारने स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले. पण तरीही राजकीय विरोधक आणि माध्यमांच्या काही विशिष्ट गटांनी आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी न्यायाचा विजय झाला आणि न्यायालयांनी माझे नाव निर्दोष ठरवले”, असं मोदींनी म्हटलं आहे.