PM Narendra Modi Interview : नुकतंच देशाच्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाची देशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशात करोना पसरला, या त्यांच्या विधानाचा काँग्रेस पक्षाकडून देशभरात निषेध करण्यात येत आहे. त्यात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना १० फेब्रुवारीपासून सुरूवात होत असून गुरुवारी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एएनआय वृत्तसंस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत घेण्यात आली.
या मुलाखतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, विरोधकांवर केलेल्या टीकेबाबत देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
हल्ला करण्याची भाषा मला माहिती नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. पण तथ्यांच्या आधारावर सभागृहात मी कोणती बाब सांगितली, तर माध्यमांमध्ये हेडलाई करण्यासाठी माझा काही संवाद वापरला जातो. पण मी हल्ला वगैरे करत नाही. मी प्रत्येक विषयावर तथ्य मांडली आहेत. काही विषयांवर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने, संरक्षण मंत्रालयाने भूमिका मांडली आहे. जे ऐकतच नाहीत, जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर मी काय भूमिका मांडणार? आम्ही हे ठरवलं आहे की आता देशाला पुन्हा त्या वाईट गोष्टीकडे जाऊ देणार नाही. आम्ही देशाला विध्वंसाच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या कोणत्याही मार्गावर जाण्यापासून रोखू.
या विषयी मी पूर्णपणे मौन ठेवलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानं गांभीर्याने यात लक्ष घातलं आहे. माझी कोणतीही भूमिका या तपासावर प्रभाव निर्माण करेल हे योग्य नाही. जे सत्य असेल ते त्या तपासातून समोर येईल.
उत्तर भारताशी माझे फार जवळचे संबंध राहिले आहेत. मी माझ्या पक्षाचं काम पंजाबमध्ये करायचो. मी पंजाबच्या लोकांचं शौर्य पाहिलं आहे. पूर्वीच्या काळी मी पंजाबमध्ये काम करायचो. एकदा संध्याकाळी कामानिमित्त मला उशीर झाला होता. रस्त्यात माझी गाडी बंद पडली. दूर शेतात दोन-तीन पंजाबी लोक होते. त्यांनीही गाडी ढकलली, पण गाडी सुरू झाली नाही. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गाडी इथेच राहू द्या, रात्री इथेच थांबा, जेवा आणि सकाळी जा. नंतर त्यांना कळलं की मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पण ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते असले, तरी रात्री थांबा. सकाळी त्यांच्या मुलानं मेकॅनिक आणून माझी गाडी दुरुस्त करून दिली.
मी म्हणालो की जेव्हा लॉकडाऊन झाला, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेनं देखील सांगितलं होतं की जो जिथे आहे, तिथे त्यानं थांबायला हवं. तेव्हा करोना कसं काम करतो, कसा वाढतो हे जगाला माहितीच नव्हतं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली होती. काही राज्यांनी त्याआधीच लॉकडाऊन सुरू केले होते. काँग्रेसनं मोफत तिकीट देऊन लोकांना प्रोत्साहित केलं की तुम्ही जा. त्या वेळी काँग्रेसनं असं केलं नसतं, तर श्रमिकांना काय घडतंय याचा अंदाज काही दिवसांत आला असता. त्यानंतर योगींना इथून बसेस पाठवाव्या लागल्या. यांनी लोकांमध्ये भिती निर्माण केली गेली. लोकांना असं वाटत होतं की भारतातली परिस्थिती सर्वात वाईट होऊ शकते. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक प्रकारची संकटं होती हे मानायला हवं. त्यामुळे आम्ही गर्वाने सांगू शकतो की भारतीयांनी आपली शिस्त पाळली.
करोना संपला हे आजही मी म्हटलेलो नाही. हा बहुरूपी आहे. तो नवनव्या रुपात समोर येत आहे.
देशाच्या सरकारचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जनतेशी संवाद करत राहायला हवं. प्रत्येकानं माझंही ऐकायला हवं, माझ्या सरकारचं देखील ऐकायला हवं. चर्चा होत राहिली पाहिजे. आमचं तर म्हणणंच आहे की सगळंच ज्ञान सरकारी अधिकारी आणि नेत्यांकडे आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही सगळ्यांकडून शिकू इच्छितो, सगळ्यांकडून आम्हाला सल्ले हवे आहेत.
देशाला भ्रष्टाचार वाळवीप्रमाणे पोखरत चालला आहे. मी काही केलं नाही, तर जनता मला माफ करेल का? सरकारला कुठून माहिती मिळाली, तर त्यावर कारवाई व्हायला नको का? अशा प्रकारे कारवाई केल्यावर माझं कौतुक व्हायला हवं. निवडणुकांच्या वेळीच कारवाई का? तर भारतात नेहमीच निवडणुका चालू असतात. मग तुम्ही असं तरी ठरवा की देशात ५ वर्षांत एकदाच निवडणुका होतील. ईडी-सीबीआय त्यांच्या पद्धतीने कारवाई करतात. पण निवडणुका मध्ये येतात, तर त्याला ते काय करणार? ते तर त्यांच्या वेळापत्रकानुसार कारवाई करत असतात.
उत्तर प्रदेशात विरोधकांनी एकदा गुजरात के दो गधे असं एकदा म्हटलं होतं. उत्तर प्रदेशच्या जनतेनं त्यांना उत्तर दिलं होतं. एकदा तर दोन तरुण आणि एक बुवाजी देखील त्यांच्यासोबत होत्या. पण तरी देखील फार काही होऊ शकलं नाही.
देशाची आज जी परिस्थिती आहे, त्यात सर्वात महत्त्वाची विचारसरणी काँग्रेसची राहिली आहे. आजपर्यंत देशाच्या पंतप्रधानांपैकी मी आणि अटल बिहारी वाजपेयी सोडून सगळे पंतप्रधान काँग्रेस विचारसरणीचेच मिळाले आहेत. हीच घराणेशाही देशात राहिली, तर देशाचं किती मोठं नुकसान होईल. काँग्रेसमुक्त भारत असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मला संख्येविषयी बोलायचं नसतं. काँग्रेसने राजकारणात चारित्र्याची विशिष्ट पद्धती रुजवली आहे, ती देशासाठी घातक आहे. काँग्रेसनं चांगल्या पद्धतीनं काम केलं असतं, तर देश कुठल्या कुठे पुढे गेला असता.
मी कुणाच्या वडिलांविषयी, कुणाच्या आजोबांविषयी किंवा कुणाच्या आईविषयी काहीही बोललेलं नाही. मी देशाच्या पंतप्रधानांबद्दल काहीतरी सांगितलं आहे. देशाचा हा हक्क आहे. आम्हाला नेहमीच बोललं जातं की तुम्ही नेहरूंचं नाव घेतलं जात नाही. आम्ही नाव घेतलं, तरी देखील आमच्यावर टीका केली जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन पक्ष आहेत. पंजाबमध्ये कुटुंबाचा पक्ष आहे, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडूमध्ये एका कुटुंबाशी संबंधित पक्ष आहेत. हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. कुटुंबांशी संबंधित पक्ष लोकशाहीच्या मूलभूत तत्वाच्याच विरोधात असतात. कुटुंबाला वाचवा, देश वाचला-न-वाचला, फरक पडत नाही. घराणेशाहीत काय होतं, मुलगा कसाही असो, तोच पुढचा अध्यक्ष होईल. अशा वेळी सर्वात मोठं नुकसान टॅलेंटचं होतं. असे पक्ष नव्या तरुणांना राजकारणात येण्यापासून रोखतात. एखाद्या तरुणाला भाजपामध्ये जायचं नसेल, तर त्याच्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नाहीये. तरुण सार्वजनिक जीवनात येण्यापासून घाबरत आहेत.
एका कुटुंबातील दोन लोक निवडणुकीत उभे राहिले आणि निवडून येऊन लोकसभेत गेले, तर तो एक राजकारणाचा भाग आहे. पण एकाच कुटुंबातले लोक पक्षातल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत असतील, तर त्यात कुठलं डायनॅमिक नसून फक्त डायनेस्टी आहे.
सरकारला व्यवसायामध्ये कोणताही रस नाही. सरकारचं काम गरीबांसाठी सोयी-सुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, गावा-गावांत रस्ते बांधणं हे आहे. माझ्यासाठी हीच प्राथमिकता आहे. मला लोकांना घरं द्यायची आहेत, शुद्ध पिण्याचं पाणी द्यायचं आहे. जर कुणी याला समाजवाद म्हणत असेल, तर हा समाजवाद मला प्रिय आहे. मी जेव्हा नकली समाजवाद म्हणतो, तेव्हा तो पूर्ण घराणेशाही असतो. लोहिया हे समाजवादी असूनही त्यांचं कुटुंब कुठेच दिसत नाही. मला कुणीतरी चिट्ठी लिहिली होती. त्यांनी म्हटलं की सपाच्या परिवारातले ४५ लोक असे होते, जे पक्षाच्या कोणत्या ना कोणत्या पदावर होते. २५ वर्षांवरच्या जवळपास सर्वांनाच निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली आहे. नकली समाजवाद मी यालाच म्हणतो.
देशात भारतानं आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. ती माध्यमांच्या ताकदीपेक्षाही पुढे निघून गेली आहे. माध्यमं विशिष्ट प्रकारची बातमीदारी का, कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या दबावाने करतात यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. पण माध्यमांमध्येही मोठी स्पर्धा आहे. त्यांचे काही नाईलाज देखील आहेत. यानंतर देखील आमचं म्हणणं जगापर्यंत याच माध्यमांमधून पोहोचलं आहे. यात काही चांगले लोक देखील आहेत. जागतिक माध्यमांचं म्हणाल, तर एखादाच देश असा असेल, जिथे माध्यमं आपल्या देशाच्या हितासाठी काही करतात. आज भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आहे. करोना आला, तेव्हा जगातल्या १५० हून जास्त देशांनी मला फोन करून आपल्याकडे औषधं मागितली असतील. जे २४ तास राजकारण करतात, त्यांचा काही नाईलाज असेल. पण मी नेहमीच सत्य बोलत असतो.
भारतासारख्या देशात विविधतेनं नटलेली समाजव्यवस्था आहे. त्यात आपण थोडं जरी पुढे-मागे केलं तर देशाचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे समाजातल्या सर्वात छोट्या घटकाला देखील विकासात संधी मिळायला हवी. आपल्याकडे सर्वसमावेशक विकास व्हायला हवा, सर्वांच्या हिताचा विकास व्हायला हवा.
भाजपा असा पक्ष आहे ज्याचं असं मत आहे की देशाच्या विकासासाठी आपल्याला प्रादेशिक अस्मितांचा आदर ठेवायलाच हवा. देशातला मी पहिला मुख्यमंत्री होतो, जो इतका काळ राज्याचा मुख्यमंत्री होता. त्यामुळे राज्याच्या अस्मिता, गरजा यांची मला चांगली समज आहे. जगभरातले अतिथी येतात. त्यांना मी वेगवेगळ्या राज्यांत घेऊन जातो. या देशाच्या प्रत्येक राज्याला प्रोत्साहन देणं हाच आमचा हेतू आहे. त्यासाठीच मी प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. पण आज दुर्दैवाने काही लोक आपल्या स्वार्थासाठी या विविधतेला एक-दुसऱ्यासोबत विरोध करण्यासाठी बीजाच्या रुपाने वापर करत आहेत. गेल्या ५० वर्षांचा अनुभव हाच आहे. त्यातूनच विलगतावाद निर्माण होतो. भारताच्या नागरिकांचं हे चरित्र नाही.
दुहेरी इंजिनचं सरकार असेल, तर गरीबांना सगळ्याच जास्त फायदा होतो. भारताचं वैविध्य कायम ठेवतानाच व्यवस्थेला देखील कायम ठेवायचं आहे.
कोणत्याही कुटुंबात आई-वडील सर्व भावंडांना सांगतात की आपण सगळे एका दिशेने मार्गक्रमण केलं, तर आपलं चांगलं होईल. एक देश म्हणून आपण वेगवेगळ्या दिशेने गेलो, तर आपली संसाधनं वाया जातील. त्यामुळे लोकांच्या भल्यासाठी आपण एकाच दिशेने जायला हवं. त्यातही आपण म्हणालो की माझं राज्य आहे, मी हव्या त्या दिशेने जाईन, तर ते लोकांसाठी चुकीचं ठरेल.
जेव्हा लोक उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षेच्या विषयावर बोलतात, तेव्हा तिथल्या सामान्य लोकांना ज्या प्रकारे भूतकाळात माफियाराजचा अनुभव घ्यावा लागला आहे, अशा गोष्टी उत्तर प्रदेशनं जवळून पाहिल्या आहेत. आज उत्तर प्रदेशची मुलगी म्हणते की मी संध्याकाळी अंधार झाल्यानंतर देखील बाहेर पडू शकते. उत्तर प्रदेशात एक काळ होता जिथे गुंड वाट्टेल ते करू शकत होते. आज परिस्थिती आहे की हे गुंडच पाया पडत आहेत की आम्हाला तुरुंगातच ठेवा, तिथेच आम्ही सुरक्षित राहू शकू. योगींनी सुरक्षेला प्राथमिकता दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांची मेहनत आणि त्यातून आलेल्या एखाद्या योजनेला आपली म्हणण्यासाठी कुणी प्रयत्न करत असेल, तर मी असं म्हणतो की योगींची ही योजना इतकी चांगली आहे की विरोधक देखील ती आपली म्हणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक प्रकारे हे योगींचं श्रेय असल्याचं मी मानतो.
आमच्यासाठी निवडणूक म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी आहे. इथे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात.
आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो की विजय आमच्या डोक्यात नको शिरायला. आणि पराभवाचं म्हणाल, तर आम्ही त्यातही आशेचा किरण शोधतो. आम्ही विचार करतो की समोरच्याची रणनीती काय होती, तो लोकांची मनं जिंकण्यात कसा यशस्वी ठरला. त्यानंतर आम्ही पुढचं धोरण ठरवतो. आम्ही प्रत्येक निवडणुकीतून शिकतो.
भाजपा निवडणूक हरत हरतच जिंकू लागली आहे. आम्ही खूप पराभव पाहिले आहेत. डिपॉझिट्स जप्त होताना पाहिले आहेत. मी राजकारणात नसताना जनता पक्षाच्या पराभवानंतर मिठाई वाटताना पाहिलं. मी विचार केला की हे हरून देखील मिठाई का वाटत आहेत. तर मला म्हणाले की आमच्या तीन लोकांचं डिपॉझिट वाचलं, म्हणून आम्ही मिठाई वाटत आहोत. त्यामुळे असे दिवस पाहिलेले आम्ही लोक आहोत. आम्ही जेव्हा निवडणूक जिंकतो, तेव्हा आम्ही लोकांची मनं जिंकण्याच्या कामात कधीही मागे पडत नाहीत. आमच्यासाठी प्रत्येक काम जनतेचं मन जिंकण्यासाठी केलेलं असतं.
भाजपा सामुहिक नेतृत्वावर विश्वास ठेवते. प्रचाराच्या बॅनर्सवर नरेंद्र मोदी नावाच्या भाजपा कार्यकर्त्याचा फोटो असतो. माझ्यासाठी त्या फोटोचा अर्थ एवढाच आहे.
भाजपाला लोकांनी २०१४ मध्ये स्वीकारलं, २०१९मध्ये स्वीकारलं, काम पाहून २०२२ मध्ये देखील ते आम्हाला स्वीकारतील.