१ जुलै रोजी राहुल गांधींनी लोकसभेत जे भाषण केलं त्यात त्यांचा आक्रमपणा दिसून आला. इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही या भाषणाचं कौतुक केलं. शंकराचा फोटो, तसंच इतर धर्मांतील धर्मगुरुंचे फोटो, येशू ख्रिस्ताचा फोटो हे सगळं त्यांनी दाखवलं. त्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जितके आक्रमक राहुल गांधी झाले होते नरेंद्र मोदी त्यापेक्षा कैक पटीने शांत होते. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींची यथेच्छ खिल्ली उडवली. तसंच ९९ जागांवरुन त्यांनी एक किस्सा सांगितला आणि शोले सिनेमातला डायलॉगही म्हटला.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

अध्यक्ष महोदय, “२०२४ च्या निवडणुकीने काँग्रेसलाही जनादेश मिळाला. हा जनादेश आहे की तुम्ही विरोधातच बसा. विरोधी पक्षात बसा आणि तर्क संपले की ओरडत राहा, किंचाळत राहा. काँग्रेसच्या इतिहासात सलग तीनवेळा काँग्रेस १०० जागाही जिंकू शकलेली नाही. काँग्रेसच्या इतिहासात हा तिसरा मोठा पराभव आहे. हा पराभव काँग्रेसने मोठ्या मनाने मान्य करायला हवा होता. जनादेश मान्य केला असता आणि अंतर्मुख होऊन विचार केला असता. मात्र काही लोक शीर्षासन करत आहेत. काँग्रेस आणि त्यांची इको सिस्टीम लोकांच्या मनात ही धारणा निर्माण करते आहे की काँग्रेसने आम्हाला हरवलं. मी आज हे सांगू इच्छितो, १९८४ चा अपवाद सोडला तर आजपर्यंत १० वेळा लोकसभा निवडणुका झाल्या. त्यातल्या एकाही निवडणुकीत काँग्रेस २५० जागांच्या संख्येला स्पर्श करु शकलेला नाही.”

हे पण वाचा- “हिंदू समाजाविरोधातील अपमानजनक वक्तव्ये योगायोग की…”, मोदींचं काँग्रेसविरोधात सूचक विधान; म्हणाले, “देवाच्या रुपांचा…”

९९ मार्कांचा किस्सा

“मला आज एक किस्सा आठवतो आहे, ९९ गुण मिळालेला एक मुलगा अहंकारात फिरत होता. सगळ्यांना सांगत होता की बघा किती छान गुण मिळाले. लोकांनाही कौतुक वाटत होतं. तेवढ्यात त्याचे शिक्षक आले त्या मुलाला विचारलं काय रे मिठाई कसली वाटतोस? तू १०० पैकी ९९ नाही मिळवलेत, ५४३ पैकी ९९ मिळवलेत. बालबुद्धी माणसाला कोण सांगणार? तू अपयशी होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.” असं म्हणत मोदींनी राहुल गांधींची फिरकी घेतली.

शोलेतला संवाद

“सध्या लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांची जी वक्तव्यं समोर येत आहेत त्यात त्यांनी तर शोले सिनेमाचे संवाद लिहिणाऱ्यांनाही मागे टाकलं आहे. ‘शोले’ मधली ‘मौसी’ तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल. तिसऱ्यांदा तर हरलो आहे, पण मौसी मॉरल व्हिक्टरी तो है ना असं काँग्रेसवाले म्हणत आहेत. १३ राज्यांमध्ये यांच्या शून्य जागा आल्या आहेत तरी म्हणत आहेत, ‘मौसी १३ राज्योमें झीरो सीट है मगर हिरो तो है ना.’ ‘अरे पार्टी लुटिया तो डुबोयी मगर पार्टी अभी साँसे तो ले रही है.’ मी काँग्रेसच्या लोकांना सांगू इच्छितो जनादेश आहे तो मान्य करा. खोटा विजय साजरा करु नका. असा टोलाही नरेंद्र मोदींनी लगावला.