पीटीआय, नवी दिल्ली
आगामी महाकुंभ ‘एकतेचा महाकुंभ’ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये केले. आगामी भव्य धार्मिक मेळाव्यातून समाजातील द्वेष आणि फूट संपवण्याचा संकल्प घेऊन परतण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ‘महाकुंभ का संदेश एक हो पुरा देश’ (महाकुंभचा संदेश संपूर्ण देश एक झाला पाहिजे). ‘गंगा की अविरल धारा, ना बनते समाज हमारा’ (गंगेच्या अखंड प्रवाहाप्रमाणे आपला समाज एक राहू दे), असे पंतप्रधान म्हणाले. १३ जानेवारीपासून प्रयागराज येथे होणाऱ्या या विशाल मेळ्याला भेट देणाऱ्या लोकांच्या विविधतेवर भाष्य करताना विविधतेतील एकतेचे असे दुसरे उदाहरण नसल्याचे ते म्हणाले. महाकुंभचे आयोजन १२ वर्षांनी होत असते.
फेब्रुवारीमध्ये ‘वेव्ह्ज’ शिखर परिषद
भारत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रथमच ‘जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट’ (वेव्ह्ज) आयोजित करणार आहे. जे देशातील प्रतिभा, सहकार्यांना चालना देण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या सामग्री निर्मितीचे केंद्र म्हणून देशाची क्षमता दर्शविणारे जागतिक व्यासपीठ असेल, असे मोदी यांनी सांगितले. ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या शिखर परिषदेसाठी माध्यम आणि मनोरंजन उद्याोगातील तसेच जगभरातील प्रतिभावंत दिल्लीत एकत्रित होणार आहेत. ही शिखर परिषद भारताला जागतिक मनोरंजन सामग्री निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.
हेही वाचा : क्रूरतेचा कळस! रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी; चिमुकली मुलं ओल्या कपड्यांत थंडीत कुडकुडली!
पाण्याखाली ड्रोन, बहुभाषिक चिन्हे
नववर्षारंभी प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभसाठी उत्तर प्रदेश सरकारने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली असून, त्याअंतर्गत पाण्याखाली १०० मीटर आणि जमिनीपासून १२० मीटर उंचीवर लक्ष ठेवण्यास सक्षम ड्रोन तैनात केले जाणार आहेत. महाकुंभ दरम्यान प्रथमच पाण्याखालील ड्रोन संगम परिसरात तैनात केले जाणार आहेत तर ‘टेथर्ड ड्रोन’ हवाई संरक्षण करतील. पाण्याखालील ड्रोन चोवीस तास कार्यरत राहणार असून कमी प्रकाशातही ते कार्य करण्यास सक्षम आहेत. १०० मीटर खोलीवर काम करण्याची क्षमता असलेले हे ड्रोन कोणत्याही परिस्थितीची अचूक माहिती देण्यास सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तींच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान प्रथमच तैनात करण्यात आलेली ड्रोनविरोधी यंत्रणाही महाकुंभदरम्यान वापरली जाणार आहे. याशिवाय ९२ रस्त्यांचे नूतनीकरण केले जात असून ३० पूल बांधले जात आहेत तसेच यात्रेकरू आणि इतर भाविकांच्या सोयीसाठी ८० बहुभाषिक चिन्हेही लावली जात आहेत.
मेळ्यात कोट्यवधी नागरिक सहभागी होतात. संत, हजारो परंपरा, शेकडो संप्रदाय आणि आखाडे या मेळ्याचा भाग बनतात. यात कोणताही भेदभाव नाही. कोणीच लहानमोठाही नाही. विविधतेतील एकतेचे असे दृश्य जगात कुठेच दिसणार नाही. या वेळचा महाकुंभ एकतेच्या महाकुंभचा मंत्र मजबूत करेल. या वेळी महाकुंभमध्ये एकतेचा संकल्प घेऊनच सहभागी होऊ.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रथमच ‘एआय चॅटबॉट’
महाकुंभमध्ये प्रथमच एआय चॅटबॉट तैनात केला जाणार असून डिजिटल नेव्हिगेशन सुविधेमुळे नागरिकांना विविध घाट, मंदिर तसेच साधूंच्या आखाड्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच महाकुंभशी संबंधित माहिती एआय चॅटबॉटद्वारे ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. या वेळी पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला देत देशात मलेरिया रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचीही माहिती दिली. तसेच भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा जगात अंगीकार होत असल्याबाबतही भाष्य केले.