PM Modi meets – Muhammad Yunus Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांची थायलंड येथे भेट घेतली आहे. मागच्या वर्षी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना हद्दपार केल्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. बिमस्टेक (BIMSTEC) परिषदेसाठी पंतप्रधान मोदी थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी झालेल्या बिमस्टेक परिषदेच्या रात्रीच्या जेवणासाठीही दोन्ही नेत्यांनी एकत्र हजेरी लावली होती.

मुहम्मद युनूस यांनी काही दिवसांपूर्वी ईशान्य भारताविषयी टिप्पणी केली होती. चीनच्या दौऱ्यावर असताना मुहम्मद युनूस म्हणाले की, भारताच्या ईशान्य भारतातील सातही राज्यांना भूप्रदेशाचा वेढा आहे. या राज्यांतून महासागरापर्यंत पोहोचता येत नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी बांगलादेश महासागराचे एकमेव रक्षक आहे. मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशला ‘गार्डियन ऑफ द सी’ असे संबोधले होते. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला होता.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही, स्थिरता, शांतता आणि प्रगतीसाठी बांगलादेशला भारताचा पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच बांगलादेशमधील हिंदूंसह अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दल भारताला चिंता वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हिंदूवर झालेल्या अत्याचारांच्या प्रकरणांची चौकशी करावी, असेही

मागच्या वर्षी बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलन आक्रमक झाल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचारांची मालिका सुरू झाली. दरम्यान बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मुहम्मद युनूस यांची चीन आणि पाकिस्तानशी जवळीक वाढलेली दिसली. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि मुहम्मद युनूस यांची भेट महत्त्वाची मानली जाते.

बिमस्टेक परिषदेत मंत्र्यांच्या बैठकीत संबोधित करताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, आमचा ईशान्य भारतातील प्रदेश बिमस्टेकसाठी महत्त्वाचा ठरत आहे. येथे रस्ते, रेल्वे, जलमार्ग, ग्रीड आणि पाइपलाइनचे मोठे जाळे आहे. त्रिपक्षीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे भारताचा ईशान्य भाग प्रशांत महासागराशी जोडला जाईल. त्यानंतर या भागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल.