PM Narendra Modi – Donald Trump Meet: गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेतून भारतात पाठवल्या जाणाऱ्या भारतीयांचा मुद्दा देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सर्वात आधी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अमेरिकेतील बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याबाबत दिलेल्या आदेशांचा समावेश होता. यानुसार इतर देशातील नागरिकांप्रमाणेच भारतीयांनादेखील मायदेशी पाठवलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प भेटीनंतर या मुद्द्यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारताच मोदींनी त्यावर भूमिका मांडली.
शुक्रवारी पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली. अमेरिकेकडून लागू करण्यात येत असलेल्या टेरिफसंदर्भातदेखील मोदी व ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली. या मुद्द्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा मुद्दाही ऐरणीवर आला. यासंदर्भात बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
अमेरिकेकडून देशात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना परत त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जात असून या धोरणाबाबत तुमची काय भूमिका आहे? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला. त्यावर मोदींनी हा मुद्दा फक्त भारताचा नसून जागतिक स्तरावरचा आहे, असं सांगितलं.
“हा प्रश्न फक्त भारताचा नाही. जागतिक स्तरावर आमचं हे मत आहे की बेकायदेशीररीत्या जे लोक दुसऱ्या देशांमध्ये वास्तव्य करत असतात, त्यांना तसं राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. भारत व अमेरिकेबाबत बोलायचं झालं, तर आम्ही नेहमी हेच म्हटलंय की जे भारतीय नागरिक असतील, ते जर अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहात असतील तर त्यांना परत घेण्यासाठी भारत तयार आहे. पण आपल्यासाठी हे इतक्यावरच थांबत नाही. हे सगळेजण सामान्य कुटुंबांमधले असतात. त्यांची मोठी स्वप्नं असतात. त्यांच्यातल्या बहुतेकांना तर फसवून इथे आणलं जातं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मानवी तस्करीच्या व्यवस्थेवर हल्ला करायला हवा”
“मानवी तस्करीच्या या संपूर्ण व्यवस्थेवर आपण हल्ला करायला हवा. अमेरिका व भारत सोबत मिळून या संपूर्ण व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत. ज्या गरीब कुटुंबातल्या मुलांना अशी मोठमोठी स्वप्नं दाखवून इथे आणलं जातं, त्यांच्यावरही हा अन्यायच आहे. त्यामुळे आपला मोठा लढा त्या व्यवस्थेविरोधात आहे. मला विश्वास आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्पदेखील या व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी भारताला सहकार्य करतील”, असंही मोदी उत्तराच्या शेवटी म्हणाले.