राहुल गांधी यांनी १ जुलै रोजी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी प्रचाराच्या वेळी स्वतःविषयी केलेले उल्लेख. हिंदुत्व, लोकसभा निवडणुकीचे निकाल, संघ, भाजपा या सगळ्यांवर भाष्य केलं. हिंदू समाज हिंसक असतो या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद लोकसभेत उमटले तसंच महाराष्ट्रातही उमटले. त्यानंतर नरेंद्र मोदी हे काय बोलणार याची उत्सुकता होती. नरेंद्र मोदींनी आज राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.

नरेंद्र मोदींनी वाचली काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका

एक कालखंड देशाने पाहिला आहे की ज्यावेळी बेशरमपणे हे मान्य केलं जायचं की दिल्लीतून एखाद्या प्रकल्पासाठी १ रुपया निघाला योजनेपर्यंत १५ पैसे पोहचतात. १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होत होता. घोटाळ्यांच्या खाईत देश बुडाला होता. शिफारस न करता काहीही मिळत नव्हतं. गरीबाला घर घ्यायचं असेल तर लाच द्यावी लागत होती. गॅस कनेक्शनसाठी खासदारांच्या घरी जावं लागायचं. वशिला लावून मग कनेक्शन मिळायचं आणि लाचही द्यावी लागायची. मोफत रेशनही लोकांना मिळत नव्हतं, त्यासाठी लाच द्यावी लागत होती. देशाने २०१४ मध्ये आम्हाला निवडलं आणि तो देशाच्या परिवर्तानाचा प्रारंभ होता. १० वर्षांत आम्ही देशाचा आत्मविश्वास परत आणला. आज देशाचा आत्मविश्वास दुणावला आहे, भारत काहीही करु शकतो हे देशातल्या सामान्य माणसाला वाटतं. असं मोदी म्हणाले. तसंच राहुल गांधींचं नाव न घेता त्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

हे पण वाचा- मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका, “बेशरमपणे हे मान्य केलं जायचं की १ रुपयातले ८५ पैसे…”

राहुल गांधी आणि काँग्रेसबाबत काय म्हणाले मोदी?

अध्यक्ष महोदय, “२०२४ च्या निवडणुकीने काँग्रेसलाही जनादेश मिळाला. हा जनादेश आहे की तुम्ही विरोधातच बसा. विरोधी पक्षात बसा आणि तर्क संपले की ओरडत राहा, किंचाळत राहा. काँग्रेसच्या इतिहासात सलग तीनवेळा काँग्रेस १०० जागाही जिंकू शकलेली नाही. काँग्रेसच्या इतिहासात हा तिसरा मोठा पराभव आहे. हा पराभव काँग्रेसने मोठ्या मनाने मान्य करायला हवा होता. जनादेश मान्य केला असता आणि अंतर्मुख होऊन विचार केला असता. मात्र काही लोक शीर्षासन करत आहेत. काँग्रेस आणि त्यांची इको सिस्टीम लोकांच्या मनात ही धारणा निर्माण करते आहे की काँग्रेसने आम्हाला हरवलं. मी आज हे सांगू इच्छितो, १९८४ चा अपवाद सोडला तर आजपर्यंत १० वेळा लोकसभा निवडणुका झाल्या. त्यातल्या एकाही निवडणुकीत काँग्रेस २५० जागांच्या संख्येला स्पर्श करु शकलेला नाही.”

पडलेल्या पोराचं मन रमवण्याचा प्रकार चालला आहे

“एखादा छोटा मुलगा जर सायकल घेऊन चालला असेल तो पडला, त्याला लागलं की तो रडू लागतो. ज्यानंतर घरातला मोठा माणूस त्याच्याकडे येतो. त्याला समजावतो त्याला सांगतो हे बघ मुंगी मेली, चिमणी उडाली, तू तर मस्त सायकल चालवतोस रे. तू पडला नाहीस रे. हे सांगून जरा त्या मुलाची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. त्याचं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करतात त्याची पाठ थोपटतात. काँग्रेसमध्ये सध्या हेच सुरु आहे. पडलेल्या पोराची पाठ थोपटली जाते आहे. लहान मुलाची समजूत घातली जाते आहे. काँग्रेसचे लोक आणि त्यांची इको सिस्टीम आज काल लहान मुलाचं मन रमवत आहेत. यावेळी काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत त्यादेखील कशाबशा जिंकल्या आहेत.”

५४३ पैकी ९९ गुण आणि मिठाई वाटत आहेत

“मला आज एक किस्सा आठवतो आहे, ९९ गुण मिळालेला एक मुलगा अहंकारात फिरत होता. सगळ्यांना सांगत होता की बघा किती छान गुण मिळाले. लोकांनाही कौतुक वाटत होतं. तेवढ्यात त्याचे शिक्षक आले त्या मुलाला विचारलं काय रे मिठाई कसली वाटतोस? तू १०० पैकी ९९ नाही मिळवलेत, ५४३ पैकी ९९ मिळवलेत. बालबुद्धी माणसाला कोण सांगणार? तू अपयशी होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची जी वक्तव्य समोर येत आहेत त्यात त्यांनी तर शोले सिनेमालाही मागे टाकलं आहे. शोलेची मौसी तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल. तिसऱ्यांदा तर हरलो आहे, पण मौसी मॉरल व्हिक्टरी तो है ना असं काँग्रेसवाले म्हणत आहेत. १३ राज्यांमध्ये यांच्या शून्य जागा आल्या आहेत तरी म्हणत आहेत मौसी १३ राज्योमें झीरो सीट है मगर हिरो तो है ना. अरे पार्टी लुटिया तो डुबोयी मगर पार्टी अभी साँसे तो ले रही है. मी काँग्रेसच्या लोकांना सांगू इच्छितो जनादेश आहे तो मान्य करा. खोटा विजय साजरा करु नका. असा टोलाही नरेंद्र मोदींनी लगावला.