संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. देशाच्या राजकीय वर्तुळात यामुळे वातावरण चांगलंच तापलं असून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच राज्यांमधल्या मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावरच पलटवार का केलात? असा प्रश्न विचारला असता मोदींनी त्यावर खोचक टोला लगावला.
“आम्ही हल्ला नव्हे, संवाद करतो”
पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावरच प्रतिहल्ला केल्याचं म्हटलं जात असल्याचा मुद्दा विचारला जाताच नरेंद्र मोदींनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “हल्ला करण्याची भाषा मला माहिती नाही किंवा माझा तो स्वभावही नाही. पण तथ्यांच्या आधारावर सभागृहात मी कोणती बाब सांगितली, तर माध्यमांमध्ये हेडलाई करण्यासाठी हल्ला या शब्दाचा वापर केला जात असेल. पण आम्ही हल्ला करत नाहीत, आम्ही संवाद करतो. वादविवाद होतो. पण मी या गोष्टींचा स्वीकार करतो. मी त्यावरून नाराज होत नाही. पण मी प्रत्येक विषयावर तथ्य मांडली आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.
राहुल गांधींना टोला!
दरम्यान, आपल्या उत्तरामध्ये मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “काही विषयांवर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने, संरक्षण मंत्रालयाने भूमिका मांडली आहे. ज्या विषयांवर गरज पडली, तिथे मी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. पण जे ऐकतच नाहीत, जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर मी काय भूमिका मांडणार?” असा प्रतिप्रश्न मोदींनी यावेळी केला.
भाषणात काँग्रेसचा इतक्या वेळा उल्लेख का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केल्याची देखील राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली होती. त्यावर देखील मोदींनी भूमिका मांडली. “देशाची आज जी परिस्थिती आहे, त्यात सर्वात महत्त्वाची विचारसरणी काँग्रेसची राहिली आहे. आजपर्यंत देशाच्या पंतप्रधानांपैकी मी आणि अटल बिहारी वाजपेयी सोडून सगळे पंतप्रधान काँग्रेसच्या विचारसरणीचेच मिळाले आहेत. हीच घराणेशाही देशात राहिली, तर देशाचं किती मोठं नुकसान होईल? काँग्रेसमुक्त भारत असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मला संख्येविषयी बोलायचं नसतं. काँग्रेसने राजकारणात वृत्तीची एक विशिष्ट पद्धती रुजवली आहे, ती देशासाठी घातक आहे. काँग्रेसनं चांगल्या पद्धतीनं काम केलं असतं, तर देश कुठल्या कुठे पुढे गेला असता”, असं मोदी यावेळी म्हणाले.
इथे पाहा पूर्ण मुलाखत!
या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या चर्चेत असलेल्या अनेक राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे.