नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज ( २३ जानेवारी ) १२६ जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त अंदमान-निकोबार बेटावरील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. तसेच, अंदमान-निकोबारवरील २१ बेटांचं नामकरणही पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या २१ बेटांना आता परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखलं जाणार आहे.
दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अंदमानच्या भूमीवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला. येथे स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झालं. वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना नावं देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश एक भारत श्रेष्ठ भारतचा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे.”
“अनेक दशकांपासून नेताजींच्या संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. हे काम सुद्धा श्रद्धेनं पूर्ण केलं जाणार आहे. लोकशाहीच्या स्तंभासमोरील ‘कर्तव्य पथ’येथील नेताजींचं स्मारक आपणांस आपल्या कर्तव्यांची आठवण करुन देते,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
‘या’ २१ परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची नावं बेटांना देण्यात आली…
मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, एमएम, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, कॅप्टन जी. एस. सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मेजर कुमार बत्रा, लेफ्टनंट कुमार बत्रा (सुभेदार) तत्कालीन रायफलमन) संजय कुमार आणि सुभेदार मेजर निवृत्त (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव या परमवीर चक्र विजेत्यांची नावे अंदमान आणि निकोबारमधील बेटांना देण्यात आली आहेत.