PM Modi Obesity Warriors List: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मोदींनी राजकारण, क्रीडा, बिझनेस आणि मनोरंजन क्षेत्रातील १० मान्यवरांची नावं त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर जाहीर केली आहेत. देशातील लठ्ठपणाची समस्या कमी करणे आणि त्याचबरोबर रोजच्या जेवणातील खाद्यतेलाचा वापरही कमी करणे या उद्देशानं ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत जनजागृतीपर उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या १० जणांना मोदींनी नॉमिनेट केलं आहे. त्यांच्या एक्स अकाऊंटवर मोदींनी ही यादी दिली आहे.

‘मन की बात’मध्ये केली होती घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर महिन्याला होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी यासंदर्भातला उल्लेख केला होता. “एका अभ्यासानुसार आज प्रत्येक आठ माणसांपैकी एक व्यक्ती ही लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. पण याहून जास्त काळजीची बाब म्हणजे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण अनेक पटींनी वाढताना दिसत आहे”, असं मोदींनी मन की बातमध्ये नमूद केलं.

“लठ्ठपणा आणि अतिरिक्त वजनामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार उद्भवतात. आपण सगळे मिळून थोडी मेहनत केल्यास या समस्येचा सामना करू शकतो. यात एक पर्याय मी सुचवला की रोजच्या जेवणातला खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करा. तुम्ही तेल खरेदी करतानाच १० टक्के कमी तेल खरेदी करून हे साध्य करू शकता”, असंही मोदी म्हणाले.

कोण आहेत मोदींचे Obesity Warriors?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाविरोधातल्या या लढ्यासाठी राजकारण, क्रीडा, बिझनेस आणि मनोरंजन या क्षेत्रांतल्या एकूण १० मान्यवरांना नॉमिनेट केलं आहे.

१. आनंद महिंद्रा – उद्योगपती
२. दिनेश लाल यादव उर्फ निरुहा – भोजपुरी अभिनेते-राजकीय नेते
३. मनू भाकेर – ऑलिम्पिक नेमबाज
४. मीराबाई चानू – ऑलिम्पिक वेटलिफ्टर
५. मोहनलाल – अभिनेते व चित्रपट निर्माते
६. नंदन निलेकणी – इन्फोसिस सहसंस्थापक
७. ओमर अब्दुल्ला – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री
८. माधवन – अभिनेते
९. श्रेया घोषाल – गायिका
१०. सुधा मूर्ती – राज्यसभा खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला यादीतील मान्यवरांनी प्रतिसाद दिला असून ओमर अब्दुल्ला यांनी या उपक्रमात आनंदाने सहभागी होत असल्याचं नमूद केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाविरोधात सुरू केलेल्या या मोहिमेचा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. लठ्ठपणामुळे हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह, श्वसनाचे आजार, नैराश्य अशा व्याधी उद्भवू शकतात”, असं अब्दुल्ला यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader