रविवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण ७१ नवनिर्वाचित खासदारांनी पदाची शपथ घेतली. मोदी वगळता उरलेल्या ७० मंत्र्यांपैकी ६० मंत्री हे भाजपाचे आहेत. इतर १० मंत्र्यांमध्ये नितीश कुमारांची जेडीयू, चंद्राबाबू नायडूंची टीडीपी, रामदास आठवलेंची रिपाइं, एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा इतर मित्रपक्षांचा समावेश आहे. ही मंत्रीपदं कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री व इतर राज्यमंत्री अशी विभागली गेली आहेत. मात्र, त्यातही राज्यनिहाय मंत्रीपदांची कशी विभागणी झाली आहे, याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसं आहे Modi 3.0 चं पहिलं मंत्रीमंडळ?

७० जणांनी शपथ घेतली असली, तरी अद्याप त्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलेलं नाही. खातेवाटप नेमकं कधी होणार? याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते येत्या काही दिवसांतच जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मंत्रीपदाप्रमाणे आणि त्या पक्षाचं सरकारमधील महत्त्व लक्षात घेऊन त्या पक्षांना खातेवाटप केलं जाण्याची शक्यता आहे. सध्या तीन प्रकारच्या मंत्रीपदांची पुढीलप्रमाणे वाटणी करण्यात आली आहे.

एकूण मंत्रीपदं – ७१

पंतप्रधानपद – नरेंद्र मोदी, भाजपा
कॅबिनेट मंत्री – ३० (भाजपा-२५, जदयू-१, जेडीएस-१, लोजप-१, एचएएम-१ टीडीपी )
स्वतंत्र पदभार – ५ (भाजपा-३, शिवसेना-१, रालोद-१)
राज्यमंत्री – ३६ (भाजपा-३२, रिपाइं-१, जदयू-२, टीडीपी-१)

दरम्यान, एकीकडे पक्षनिहाय मंत्रीपद वाटपामध्ये भाजपाचा पूर्णपणे वरचष्मा दिसत असताना दुसरीकडे राज्यनिहाय मंत्रीपद वाटपामध्ये नेमकं काय चित्र आहे आणि त्याचे काय अन्वयार्थ आहेत? यावर आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

बिहारला ४ कॅबिनेट तर ४ राज्यमंत्रीपदं!

प्रत्येक राज्याला मिळालेल्या मंत्रीपदांची आकडेवारी पाहाता उत्तर प्रदेशला वाटपात झुकतं माप दिल्याचं दिसून येतं. या राज्याला १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार आणि तब्बल ७ राज्यमंत्रीपदं देण्यात आली आहेत. पण खात्यांच्या महत्त्वानुसार पाहता बिहारला झुकतं माप दिल्याचं दिसतं. बिहारला तब्बल ४ कॅबिनेट मंत्रीपदं आणि ४ राज्यमंत्रीपदं देण्यात आली आहेत. खुद्द मोदींच्या गुजरातला ४ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्या तुलनेत चंद्राबाबूंच्या आंध्र प्रदेशला मात्र एक कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्याउलट ओडिशाला ३ कॅबिनेट मंत्रीपदं दिली आहेत.

शिवराजसिंह चौहान यांचं पुनर्वसन?

दरम्यान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळवून देणारे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना निकालांनंतर मात्र मुख्यमंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यामुळे ते राजकीय विजनवासात जाण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, यंदाच्या मंत्रीपद वाटपात शिवराज चौहान यांचा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रीमंडळात समावेश करून त्यांचं पुनर्वसनच भाजपानं केल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यासह मध्य प्रदेशला तब्बल ३ कॅबिनेट मंत्रीपदं आणि २ राज्यमंत्रीपदं देण्यात आली आहेत.

कसं आहे मोदी सरकारचं राज्यनिहाय मंत्रीपद वाटप?

गुजरात – ४ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
महाराष्ट्र – २ कॅबिनेट,१ स्वतंत्र पदभार, ३ राज्यमंत्री
उत्तर प्रदेश – १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार, ७ राज्यमंत्री
बिहार – ४ कॅबिनेट, ४ राज्यमंत्री
पश्चिम बंगाल – २ राज्यमंत्री
तमिळनाडू – २ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
हिमाचल – १ कॅबिनेट
जम्मू-काश्मीर – १ स्वतंत्र पदभार
मध्य प्रदेश – ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
हरियाणा – १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार, १ राज्यमंत्री
कर्नाटक – २ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
ओडिशा 
– ३ कॅबिनेट
आसाम – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
आंध्र प्रदेश – १ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
झारखंड – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
अरुणाचल प्रदेश – १ कॅबिनेट
पंजाब – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
तेलंगणा – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
राजस्थान – १ स्वतंत्र पदभार, १ राज्यमंत्री
गोवा – १ राज्यमंत्री
केरळ – २ राज्यमंत्री
उत्तराखंड – १ राज्यमंत्री
छत्तीसगड – १ राज्यमंत्री
दिल्ली – १ राज्यमंत्री.