PM Narendra Modi: हल्ली राजकारणाचा किंवा राजकीय भाषेचा स्तर खालावला आहे, असं सातत्याने ऐकायला मिळत आहे. मग ते सामान्य जनतेकडून असो, राजकीय विश्लेषकांकडून असो किंवा मग प्रत्यक्ष राजकीय नेतेमंडळींकडून असो. एकीकडे ही चर्चा चालू असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात आपलं वर्तन कसं ठेवायला हवं, याचे धडे दिले जात आहेत. यासाठी भाजपाकडून व्यापक कार्यक्रमच हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अशाच एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी उपस्थित खासदारांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवनिर्वाचित खासदारांशी संवाद
सध्या देशभरात निवडून आलेल्या पक्षाच्या खासदारांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम भाजपानं हाती घेतला आहे. त्यानुसार या खासदारांना जनतेशी कसं वागायचं, सार्वजनिक जीवनात आपलं वर्तन कसं असायला हवं, जनतेशी थेट संपर्क कसा ठेवायला हवा, आपली पाळंमुळं मतदारसंघात घट्ट कशी रोवायला हवीत यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी माहिती दिली जात असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी देशभरात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींसाठी भाजपाकडून अशा प्रकारचे नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात ओडिशामध्ये शुक्रवारी मोदींनी नवनिर्वाचित खासदारांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
मोदींकडून काय शिकायला मिळालं? सिद्धांत मोहपात्रा म्हणतात…
या बैठकीला उपस्थित असणारे भाजपाचे खासदार सिद्धांता मोहपात्रा यांनी बैठकीनंतर एएनआयशी बोलताना आपला अनुभव सांगितला. आपल्याला मोदींकडून इतरांशी कसं वागायचं हे शिकायला मिळाल्याचं ते म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला दिलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक जीवनात आपण कसं वागायला हवं यासाठीचं दिशादर्शन. माझ्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इतरांशी कसं वागायचं हे मी शिकलो. समस्यांचा सामना कसा करायचा हे मी शिकलो”, असं मोहपात्रा म्हणाले.