Modi Old Post On Tahawwur Rana : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात आणलं आहे. अमेरिकेकडून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणाचं पथक अमेरिकेत दाखल झालं होतं. त्यानंतर तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०११ मध्ये अमेरिकेत झालेल्या तहव्वूर राणाच्या एका खटल्याच्या निकालावर ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदींनी तत्कालीन यूपीए सरकारवरही जोरदार टीका केली होती.

पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

पंतप्रधान मोदींनी तत्कालीन यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. मोदींनी तेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की, “मुंबई हल्ल्यातील सुत्रधार तहव्वूर राणाला निर्दोष घोषित करणं हे भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान असून भारताच्या सार्वभौमत्वाला कलंकित करणारे आहे. हा परराष्ट्र धोरणासाठी हा एक मोठा धक्का आहे”, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

तहव्वूर राणा १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाचे गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. तहव्वूर राणाला एका विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले त्यानंतर एनआयएने त्याला औपचारिकपणे अटक केली. गुरुवारी रात्री तहव्वूर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाला १८ दिवसांची कोठडी दिली.

तहव्वूर राणावर काय आरोप आहेत?

राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी आहे आणि तो लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्यांची टेहाळणी (रेकी) करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद सैयद गिलानीवर सोपवण्यात आली होती. कोणाला संशय येऊ नये त्यासाठी डेव्हिड हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला होता. त्यात राणाचा मोठा सहभाग आहे. राणाचा ‘इमिग्रेशन’ व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.

त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभे करण्यात आले. त्याच्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. यावेळी त्याने अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे. हेडलीने याच इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्डे छापली होती. पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिजा अथवा इतर कोणतेही काम झाल्याचे आढळले नाही. एनआयएने या प्रकरणी २५ डिसेंबर २०११ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली होती.