Narendra Modi: दिल्लीत आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचं भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिलं. मला पण गुजराती अवडायची असं त्या म्हणाल्या. देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी केली.
“मराठी साहित्याच्या या संमेलनात महाराष्ट्राची सांस्कृतिक विरासत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. पहिल्या आयोजनापासून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा देश साक्षी राहिला आहे. महादेव गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, वीर सावरकर, देशातील अनेक महान व्यक्तींनी या संमेलनाची अध्यक्षता स्वीकारली आहे. आज शरद पवार यांच्या आमंत्रणावरून मला या गौरवपूर्ण परंपरेबरोबर जोडण्याचं भाग्य मिळालं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे आपले १०० वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.