पॅरिस : भारताने फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच बनावटीच्या तीन स्कॉर्पियन पाणबुडय़ा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण खरेदी समितीने (डीएसी) या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. यामध्ये संबंधित पूरक उपकरणे, शस्त्रे, सुटे भाग, कर्मचारी प्रशिक्षण इत्याही बाबींचाही समावेश असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आगमन झाले. मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दरम्यान शुक्रवारी चर्चा झाल्यानंतर या खरेदी प्रस्तावाची घोषणा अपेक्षित आहे. यामध्ये चार विमाने ही प्रशिक्षक विमाने असतील अशी माहिती संरक्षण खात्यातील सूत्रांकडून मिळाली. करारावर सही केल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत विमानांच्या वितरणाला सुरुवात होईल. तसेच तपशीलवार किमतीच्या वाटाघाटी अजून सुरू आहेत, त्यामुळे अंतिम करार होण्यासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागू शकतो अशी माहितीही देण्यात आली.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन सोहळय़ाचे प्रमुख पाहुणे

फ्रान्स दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दरम्यान विविध विषयांवर व्यापक चर्चा होणार असून त्यानंतर ते फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन सोहळय़ामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या सोहळय़ामध्ये भारताचे २६९ सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे.

भारतीय समुदायाशी संवाद  ‘पॅरिसमध्ये पोहोचलो. या भेटीमध्ये भारत-फ्रान्स सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहे. माझ्या विविध कार्यक्रमांमध्ये संध्याकाळी भारतीय समुदायाशी संवाद साधण्याचाही समावेश आहे’, असे ट्वीट मोदी यांनी पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर केले. पॅरिसमधील हॉटेलवर आल्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वागताला जमलेल्या भारतीय समुदायातील सदस्य आणि मुलांशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटल्यानंतर तिथे जमलेल्या भारतीयांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on a two day visit to france procurement of 26 rafale jets for navy approved zws