Pm Narendra Modi On Canada Election Results: कॅनडामध्ये लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सरकार बनवण्यात यश मिळवलं आहे. कॅनडात सोमवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं. त्यानंतर मंगळवारी ३४३ जागांसाठी मत मोजणी पार पडली. या मतमोजणीत कॅनडाची सूत्र पुन्हा एकदा मार्क कार्नी यांच्याकडे जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता लिबरल पक्ष सलग कॅनडात चौथ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर लिबरल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कॅनडात जल्लोष केला जात आहे. मार्क कार्नी हे कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल मार्क कार्नी यांचं आणि लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

“मार्क कार्नी हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल आणि लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन. भारत आणि कॅनडा हे सामायिक लोकशाही मूल्ये कायद्याच्या राज्यासाठी दृढ वचनबद्धता आणि लोकांमधील स्नेही संबंधांनी बांधलेले आहेत. दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी आणि आमच्या लोकांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत:, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, कॅनडातील लिबरल पक्षाने सलग चार वेळा मोठा विजय मिळवला आहे. तसेच कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार पिएर्रे पॉलिव्हरे यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. आता कॅनडाची सूत्र पुन्हा एकदा मार्क कार्नी यांच्याकडे आल्यामुळे भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याची शक्यता मानली जात आहे.

कोण आहेत मार्क कार्नी?

५९ वर्षीय मार्क कार्नी यांचा जन्म १६ मार्च १९६५ रोजी नॉर्थवेस्ट टेरिटरीजच्या फोर्ट स्मिथ येथे झाला. त्यांचे संगोपन एटमॉन्टन, अल्बर्टा येथे झाले. कार्नी यांनी २००८ ते २०१३ पर्यंत बँक ऑफ कॅनडा आणि २०१३ ते २०२० पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून काम केले आहे. २००८ च्या आर्थिक संकटाच्या काळात कॅनडाला सावरण्याचे काम केल्यानंतर १६९४ साली स्थापन झालेल्या बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून नियुक्ती मिळालेले ते पहिल गैर ब्रिटीश व्यक्ती होते. २०२० मध्ये त्यांना हवामान कार्यवाही आणि अर्थ यासंबंधी संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत म्हणून काम करण्यास सुरूवात केली. कार्नी हे गोल्डमन सॅक्सचे माजी कार्यकारी आहेत. २००३ मध्ये बँक ऑफ कॅनडाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी लंडन, टोकियो, न्यू यॉर्क आणि टोरंटो येथे १३ वर्षे काम केले.मार्क कार्नी यांनी १९८८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी मिळवली.