PM Narendra Modi in Sansad : संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानावर चर्चा सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संसदेतील या चर्चेत सहभाग घेत संविधानावर भाष्य केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत केलेल्या कामाचाही उल्लेख केला. तसेच गेल्या ७५ वर्षांतील महत्वाच्या काही घटनांचाही उल्लेख केला. तसेच १९७५ मध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काँग्रेसच्या डोक्यावरचं हे पाप कधीच धुतलं जाणार नाही’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“भारतीय राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. आपल्याकडे २५ वर्षाचं देखील एक महत्व असतं. तसेच ५० वर्षाचं देखील एक महत्व असतं. ६० वर्षाचं देखील एक महत्व असतं. मात्र, आपण जर इतिहासाकडे ओळून पाहिलं तर जेव्हा देश संविधानाचे २५ वर्ष पूर्ण करत होता तेव्हा आपल्या देशात संविधान हटवण्याचा प्रयत्न झाला. भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. सर्व संविधानिक व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशाला एकप्रकारे जेलखाना बनवण्यात आलं होतं. सर्वांचे हक्क हिरावून घेतले गेले होते. प्रेसच्या स्वातंत्र्यावर टाळे लावले गेले. मात्र, काँग्रेसच्या डोक्यावर लागलेलं हे पाप कधीही धुतलं जाणार नाही. जगभरात जेव्हा-जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा-तेव्हा हे काँग्रेसच्या डोक्यावरचं हे पाप दिसेल”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.

विविधतेत एकता हीच देशाची ताकद

“आपल्या देशात विविधतेत एकता आहे हीत भारताची ताकद आहे. मात्र, आपल्या देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, आपल्याला विविधतेमध्ये एकता आणावी लागेल. भारताची एकता मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. कलम ३७० ही देशाच्या एकात्मतेची भिंत बनली होती. मात्र, कलम ३७० देखील रद्द करण्यात आलं आहे. देशाची एकता हीच आमची प्राथमिकता आहे”, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्याचं काम केलं. संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर काँग्रेसच्या एका कुटुंबाने सोडला नाही. कारण ७५ वर्षांपैकी एका कुटुंबाने अनेक वर्ष राज्य केलं. मात्र, देशात काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्या देशातील नागरिकांना आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on congress emergency indira gandhi in loksabha parliment winter session in sansad gkt