नर्मदा धरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधींना टोला लगावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात आयोजित सभेत ते बोलत होते. “ज्या महिलेने गेल्या तीन दशकांपासून नर्मदा धरण प्रकल्पाला स्थगिती देणाऱ्या महिलेसोबत काँग्रेस नेता पदयात्रा करताना दिसले,” असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना लक्ष्य केलं.
मेधा पाटकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या तीन दशकांपासून कायदेशीर अडथळे निर्माण केले असल्याने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचं बांधकाम थांबलं आहे. यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांनी गुजरातची बदनामी केल्याचाही आरोप केला.
“काँग्रेस जेव्हा मतं मागण्यासाठी तुमच्या दारात येईल, तेव्हा त्यांना तुम्ही नर्मदा धरणाला विरोध करणाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून पदयात्रा काढत आहात यासंबंधी विचारा,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
मेधा पाटकर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्या होत्या. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश करत आहे. भाजपाने २०१७ मध्ये सरदार सरोवर धरणाचं उद्घाटन केलं होतं. मेधा पाटकर यांनी या धरणाला विरोध करत ‘नर्मदा बचाव आंदोलन’ छेडलं होतं. धरणाच्या पाण्यामुळे हजारो आदिवासी कुटुंब विस्थापित होतील सांगत त्यांनी विरोध केली होती.
शनिवारी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी मेधा पाटकर यांच्यावर टीका केली होती. “मेधा पाटकर ‘नर्मदाविरोधी’ ‘गुजरातविरोधी’ आणि ‘सौराष्ट्रविरोधी’ आहेत, ज्यांनी नर्मदा धरणाचं काम आणि त्याच्या पाण्याचा लोकांसाठी वापर करण्यापासून रोखलं,” असं ते म्हणाले होते. “जर असे लोक राहुल गांधींशी जोडले जात असतील, तर त्यांची मानसिकता यातून लक्षात येते,” अशी टीका त्यांनी केली होती.
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र सिंग पटेल यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना काँग्रेस खासदार गुजरामधील नागरिकांना पाणी नाकारणाऱ्यांना साथ देत आहेत असं म्हटलं होतं. गुजरात कधीही हे सहन करणार नाही असंही ते म्हणाले होते.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेशसहित गुजरातमध्येही मतमोजणी पार पडणार आहे.