लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. इंडिया आघाडीकडून भाजपावर टीका करताना अनेकदा संविधान धोक्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (११ एप्रिल) राजस्थानमध्ये आयोजित रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“एससी, एसटी, ओबीसींबरोबर अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस आजकाल एक जुने रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा निवडणूक येते तेव्हा संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. ज्या काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांना निवडणुकीत हरवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने भारतरत्न मिळू दिला नाही. ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली, संविधान संपवण्याचा प्रयत्न केला, आज तीच काँग्रेस मला शिव्या देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली खोटे बोलत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा : “काँग्रेस काही वर्षांमध्ये डायनासोरप्रमाणे नामशेष होईल”, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “पण हे ते मोदी आहेत, त्यांनी देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. याच काँग्रेसवाल्यांनी संविधान दिवस साजरा करायला विरोध केला होता. याबाबतचे त्यांचे संसदेमध्ये भाषणदेखील आहे. मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान आहे की नाही? हा संविधानाचा अपमान आहे की नाही? एवढेच नाही, हे ते मोदी आहेत, ज्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खोटेपणापासून सावध राहण्याची गरज आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले…

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “काँग्रेसल्यांनी हे लक्षात ठेवावे, ४०० जागांचे ध्येय जनतेने यासाठी ठेवले की, गेल्या १० वर्षात तुम्ही मला संसदेत चांगले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देश काँग्रेसला शिक्षा देऊ इच्छित आहे. काँग्रेसला देशातून साफ कण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे संविधानाचा प्रश्न आहे तेथे तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे. हे सर्व आमच्यासाठी संविधान आहे. हे इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Story img Loader