लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर फैरी झाडल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या टीकाटिप्पणीवर भाष्य केलं.

तसंच गांधी कुटुंबियांसोबत असलेल्या संबंधाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. “माझे सर्वांशी खूप चांगले संबंध आहेत. त्यामध्ये गांधी कुटुंबियांसोबतही चांगले संबंध आहेत. त्यांच्या अडचणीच्या काळात मी नेहमीच त्यांच्यासोबत असतो. आपले कोणाशीही वैयक्तिक वैर नाही”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? RBI बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, “मी राजकारणात…”

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“२०१९ च्या निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अडचण आली होती. त्यावेळी राहुल गांधी यांना फोन करत विचारपूस केली होती. त्यानंतर एकदा काशीमध्ये सोनिया गांधी माझ्या विरोधात प्रचार करत होत्या. मात्र, अचानक त्यांची तब्येत बिघडल्याचं मला संमजलं. त्यानंतर मी त्यांना विशेष विमान देण्याचं सांगितलं होतं”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढं म्हणाले, “एकदा सोनिया गांधी यांचं हेलिकॉप्टर दमणमध्ये क्रॅश झालं होतं. त्यामध्ये सोनिया गांधी आणि अहमद पटेल होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी त्यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा मी ताबडतोब एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो, असं म्हटलं होतं. मात्र, आम्ही सुरक्षित आहोत. फक्त हेलिकॉप्टरचं नुकसान झालं, असं त्यांनी सांगितलं होतं”, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

प्रचारादरम्यान राहुल गांधींची मोदींवर टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या हातातून लोकसभा निवडणूक निसटली आहे. त्यांनी दहा वर्षांपूर्वी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते साफ खोटे ठरले. नोटबंदी केली, जीएसटी लादली, आणि व्यापाऱ्यांच्या भल्याचे निर्णय घेतले. ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येत आहे. आमचे सरकार (इंडिया आघाडीचं) आल्यानंतर १५ ऑगस्ट पर्यंत केंद्रातील ३० लाख नोकर भरती करण्यात येईल”, असं राहुल गांधी प्रचारात म्हटले होते.

Story img Loader