देशात सत्तेत आल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या काही बहुचर्चित आणि बहुविवादित निर्णयांमध्ये जीएसटीचा (Goods and Services Tax) हमखास समावेश करावा लागेल. या निर्णयावरून अजूनही वाद सुरूच असून देशभरातील विरोधी पक्षांकडून आणि त्या त्या पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारकडून देखील मोदी सरकारवर जीएसटीवरून टीका केली जाते. मात्र, एकीकडे ही टीका सुरू असताना दुसरीकडे केंद्र सराकरकडून मात्र जीएसटीचं समर्थन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CII च्या वर्षिक बैठकीमध्ये या मुद्द्यावरून काँग्रेसवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आधीच्या सरकारमध्ये हिंमत नसल्यामुळेच जीएसटीचा निर्णय रखडल्याची भूमिका मोदींनी मांडली आहे.
CII च्या वार्षिक बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी देशातील उद्योग जगतातील व्यक्तींची चर्चा केली. तसेच, भारतातील उद्योग विश्वाला वृद्धीसाठी मोठी संधी असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र, आधीच्या सरकारपेक्षा आत्ताच्या सरकारने उद्योग विश्वाला कशा पद्धतीने मुक्त स्वातंत्र्य आणि अनेकविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, हे सांगताना त्यांनी काँग्रेसवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
“फक्त चर्चा व्हायच्या, निर्णय नव्हते होत!”
यावेळी आर्थिक सुधारणांविषयी देखील मोदींनी भूमिका मांडली. “आपण केलेल्या आर्थिक सुधारणांची मागणी कित्येक दशकांपासून केली जात होती. चर्चा तर खूप होत होत्या. पण निर्णय घेतला जात नव्हता. कारण हे मानण्यात आलं होतं की हे सुधारणा करणं कठीण आहे. पण आम्ही तेच निर्णय दृढ निश्चयाने घेतले आहेत. करोनाच्या साथीमध्ये देखील आर्थिक सुधारणा थांबल्या नाहीत”, असं मोदी म्हणाले.
“देशातलं सरकार रिस्क घ्यायला तयार”
दरम्यान, देशातील सरकार जनतेच्या हितासाठी रिस्क घ्यायला तयार असल्याचं मोदींनी CII च्या बैठकीत सांगितलं. “आज देशात असं सरकार आहे, जे राष्ट्रहितासाठी मोठ्यात मोठी रिस्क घ्यायला तयार आहे. जीएसटी तर इतक्या वर्षांपासून याचसाठी अडकलं होतं की आधीच्या सरकारमध्ये पोलिटिकल रिस्क घेण्याची हिंमत नव्हती. आम्ही फक्त जीएसटी लागूच केला नाही, तर आज रेकॉर्ड जीएसटी गोळा देखील होत आहे”, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.
मोदींचं उद्योग विश्वाला आवाहन
“आज तुमच्यासमोर असं सरकार आहे, जे प्रत्येक मर्यादा हटवतेय. आज देशातलं सरकार तुम्हाला विचारतंय, की उद्योग विश्वाची ताकद वाढवण्यासाठी अजून काय करावं लागेल ते सांगा. फक्त एकाच चाकावर गाडी व्यवस्थित चालत नाही. सगळी चाकं व्यवस्थित चालायला हवी. उद्योग विश्वाला देखील आपली रिस्क घेण्याची ताकद वाढवावी लागेल. मी तुमची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आणि प्रत्येक कल्पनेसाठी याआधीही तयार राहिलो आहे आणि इथून पुढेही नेहमी तयार राहीन”, असं आवाहन मोदींनी CII च्या बैठकीत केलं.