पीटीआय, हैदराबाद

‘‘तेलंगणात सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात सर्वत्र ‘कमळ’ फुलणार आहे,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी येथे व्यक्त केला.मोदींचे तेलंगणामध्ये शनिवारी दुपारी आगमन झाले. त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन व काही प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. तसेच रामागुंडम येथील खत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.२०२३ च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ‘टीआरएस’ला शनिवारी लक्ष्य केले.

तेलंगणामध्ये भाजपकडून के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील ‘टीआरएस’ला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.‘टीआरएस’चे नाव न घेता मोदी म्हणाले, की राज्य सरकार व त्यांचे नेते तेलंगणाच्या क्षमतेवर व लोकांच्या प्रतिभेवर अन्याय करत आहेत. माहिती-तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये अंधश्रद्धा जोपासल्या जात आहेत. ज्या राजकीय पक्षावर तेलंगणाचा प्रचंड विश्वास होता, त्यानेच नागरिकांचा विश्वासघात केला आहे. राज्यात मिळणाऱ्या संकेतानुसार येथे लवकरच ‘कमळ’ (भाजपची सरशी होणार) फुलणार आहे. अलीकडच्या पोटनिवडणुकांच्या निकालांचा कल पाहता सूर्योदयास फार विलंब नसल्याचे संकेत मिळाले आहेत. लवकरच अंधार नाहीसा होईल. सर्वत्र कमळ फुलणार आहे.

घराणेशाहीवर टीका
के. चंद्रशेखर राव यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले, की ‘‘आता तेलंगणातील मतदारांना एका कुटुंबाऐवजी तेलंगणातील सर्व कुटुंबांसाठी काम करणारे सरकार हवे आहे. त्यांना भाजपचे सरकार हवे आहे.’’ पक्षाने गेल्या दोन वर्षांत दोन विधानसभा पोटनिवडणुका जिंकल्या. त्याशिवाय यापूर्वी ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली होती.

Story img Loader