स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक आणि कवी अशी ओळख असलेले विनायक दामोदर सावरकर अर्थात वीर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.
हेही वाचा – “ही कुठली खान मार्केट गँग?” ED, CBI च्या कारवाईवरून होणाऱ्या टीकेला पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत वीर सावरकर यांना अभिवादन केलं. याबरोबरच त्यांनी एका व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. मातृभूमीच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओ दिलं आहे. तसेच आज २८ मे रोजी वीर सावरकर यांची जयंती आहे. त्यांचा त्याग, शौर्य आणि संकल्प शक्तीच्या कथा आजही आपल्याला प्रेरणा देतात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वीर सावरकर यांना अभिवादन केलं आहे. वीर सावरकर यांनी आपल्या ज्वलंत विचारांनी देशातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागवली. तसेच एक राष्ट्र, एक संस्कृती ही भावना निर्माण केली. त्यांनी राष्ट्रवादाचा मंत्र आत्मसात केला आणि तुष्टीकरणाच्या धोरणांना जोरदार विरोध केला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या वीर सावरकरांनी अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या प्रथेविरोधात जनजागृती मोहीम सुरू केली. वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो, असे ते म्हणाले.
वीर सावरकर या नावाने सर्वत्र परिचित असलेले विनायक दामोदर सावरकर हे लेखक, राजकारणी, समाजसुधारक, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना याच्यावर त्यांचे प्रभुत्व होते. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांनी स्वातंत्र्यांच्या लढ्यात सहभाग घेतला. ते हिंदू महासभेचे महत्त्वाचे नेते होते. ब्रिटिशांनी त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली होती.