PM Modi Visit CJI Chandrachud Home: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. एएनआय वृत्तसंस्थेने या भेटीचा एक व्हिडीओ एक्स साईटवर टाकला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी गणपतीचे दर्शन घेऊन आरतीमध्ये सहभाग घेतला.

पंतप्रधान मोदींनी याप्रसंगी मराठमोळा पोशाख परिधान केला होता. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या घटनेवर नापसंती व्यक्त केली आहे. तर काहीजणांनी या भेटीचा संबंध थेट महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांशी लावला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे महाराष्ट्रातून येतात. गणेशोत्सवा हा राज्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे.

संजय राऊत यांची टीका

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे नाव न घेता या भेटीवर आक्षेप व्यक्त केला आहे. मोदींच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले, “संविधानाच्या घरालाच आग लागली. घरातील दिव्याने, ईव्हीएमला क्लीन चीट दिली, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या सुनावणीला तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू, पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप मात्र महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणात अवाक्षर काढले नाही, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर तारीख पे तारीख… हे का होत आहे? तुम्ही सर्व घटनाक्रम एकदा समजून घ्या.. भारत माता की जय”

सरन्यायाधीश निवृत्तीला आले, पण घटनाबाह्य सरकारबद्दल निर्णय कधी?

चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश असून ते नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. पंतप्रधान किती जणांच्या घरी गेले याची माहिती नाही. सरन्यायाधीशांच्या घरी ते गेले, आरती करत आहेत, त्यांचा संवाद पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळाले. खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या विरोधात आमची जी लढाई सुरू आहे त्यात न्याय का मिळत नाही किंवा तारखांवर तारीख का पडत आहे, आमच्या लोकांच्या मनात शंका आहे. हे का होतंय. सरन्यायाधीश चंद्रचुडांच्या पदावर असताना तीन वर्षे बेकायदा सरकार बसवले गेले. हे सरकार घटनाबाह्य आहे, असे सरन्यायाधीश सांगत नाहीत. ते आता निवृत्तीला आले आहेत. त्यामुळे याच्यामागे वेगळे काही घडतेय का? सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे स्वाभीमानी पक्ष संपविण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का? अशी शंका लोकांच्या मनात घट्ट झाली असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

वाईट संकेत जात आहेत

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या खासगी निवासस्थानी येण्यास मान्यता दिली, हे धक्कादायक आहे.

संविधानाने प्रदान केलेल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची आणि सरकार संविधानाच्या मर्यादेत काम करत आहे की नाही? याची खात्री करण्याची जबाबदारी असलेल्या न्यायव्यवस्थेसाठी या घटनेतून अतिशय वाईट संकेत जात आहेत. त्यामुळेच न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात एका हाताचे अंतर असणे आवश्यक आहे, असे मत प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले.

Story img Loader