Dr. Manmohan Singh Dies at 92: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. देशभरात आज राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक आणि इतरही क्षेत्रांमधून मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशानं एक अभ्यासू अर्थतज्ज्ञ आणि मितभाषी व्यक्तीमत्व गमावल्याच्या भावना व्यक्त होताना दिसत आहेत. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सिंग यांच्या निधनावर सोशल पोस्ट केली होती. आज त्यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली देणारा व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी फाळणीच्या वेळचे काही संदर्भ आपल्या व्हिडीओमध्ये दिले. “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठं दु:ख झालं आहे. त्यांचं आपल्यातून जाणं एक देश म्हणून आपलं खूप मोठं नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावल्यानंतर भारतात येणं आणि इथे आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत यश संपादन करणं ही सामान्य बाब नाही. कमतरता आणि संघर्षांमधून पुढे येऊन कशा प्रकारे नवी क्षितिजं गाठली जाऊ शकतात, याची शिकवण त्यांचं जीवन भावी पिढीला देत राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संदेशाच्या सुरुवातीलाच नमूद केलं.
“पंतप्रधान म्हणून त्यांचं योगदान…”
“एका चांगल्या व्यक्तीच्या रुपात, एका विद्वान अर्थतज्ज्ञाच्या रुपात आणि सुधारणांच्या बाबतीत समर्पित नेत्याच्या रुपात त्यांना कायम स्मरणात ठेवलं जाईल. एका अर्थतज्ज्ञाच्या रुपात त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर भारत सरकारमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. एका आव्हानात्मक काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारीही सांभाळली. माजी पंतप्रधान भारतरत्न पी. व्ही. नरसिंह राव सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला नव्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आणलं. पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील”, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांनी विविध पदांवर राहून देशाच्या केलेल्या सेवेचा उल्लेख केला.
“व्हीलचेअरवर येऊनही ते आपली जबाबदारी पार पाडत होते”
“जनतेप्रती, देशाच्या विकासाप्रती त्यांची बांधीलकी नेहमीच सन्मानपूर्वक पाहिली जाईल. डॉ. मनमोहन सिंग यांचं जीवन म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा व सौजन्याचं प्रतीक होतं. ते एक उत्तम संसद सदस्य होते. त्यांची विनम्रता, सौम्यता आणि प्रगाढ बौद्धिक सामर्थ्य त्यांच्या संसदीय कार्यकाळाची ओळख ठरलं. मला आठवतंय, या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला, तेव्हा मी म्हणालो होतो की संसद सदस्याच्या रुपात मनमोहन सिंग यांची निष्ठा सगळ्यांसाठी प्रेरणादायी होती. अधिवेशनाच्या काळात महत्त्वाच्या दिवशी ते व्हीलचेअरवर येऊन आपली ससदीय जबाबदारी पार पाडत होते”, असा उल्लेख नरेंद्र मोदींनी व्हिडीओमध्ये केला आहे.
“त्यांची मूल्य ते कधीच विसरले नाहीत”
“जगभरातल्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आणि सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर राहिल्यानंतरही ते आपल्या सामान्य पार्श्वभूमीच्या मूल्यांना कधीच विसरले नाहीत. राजकारणाच्याही पुढे जाऊन त्यांनी प्रत्येक पक्षातल्या लोकांशी संपर्क ठेवला. सगळ्यांसाठी सहज उपलब्ध राहिले. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मनमोहन सिंग यांच्याबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा होत होत्या. दिल्लीत आल्यानंतरही माझं त्यांच्याशी वेळोवेळी बोलणं होत होतं. त्यांच्याशी झालेल्या भेटी, त्यात झालेल्या देशासंदर्भातल्या चर्चा नेहमीच मला लक्षात राहतील. त्यांच्या वाढदिवशीही मी त्यांच्याशी बोललो होतो”, अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या शेवटी सांगितली आहे.