त्रिशूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केरळमधील गुरुवायूर येथील प्रसिद्ध भगवान कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पूजा-प्रार्थना केली. तसेच अभिनेते-राजकीय नेते सुरेश गोपी यांच्या कन्येच्या विवाह सोहळयात ते सहभागी झाले. या सोहळयात मल्याळी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री उपस्थित होत्या.
गुरुवायूर मंदिरात पूजेदरम्यान पंतप्रधानांनी केरळचा पारंपरिक पोशाख ‘मुंडू’ आणि ‘वेष्टी’ (पांढरी शाल) परिधान केला होता. या पेहरावातील छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसृत करताना त्यांनी नमूद केले, की पवित्र गुरुवायूर मंदिरात प्रार्थना केली. या मंदिराची दैवी ऊर्जा अफाट आहे. प्रत्येक भारतीय सुखी आणि समृद्ध व्हावा, अशी मी प्रार्थना केली.
हेही वाचा >>> “माझे आई-बाबा रामाच्या दर्शनासाठी आतुर, पण निमंत्रण नाही, आता मी…”, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
मंदिरात सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी मामुट्टी, मोहनलाल आणि दिलीप यांच्यासह अनेक चित्रपट कलाकार तेथे उपस्थित होते आणि पंतप्रधानांनी सर्वांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गोपींच्या कन्येच्या विवाहाआधी सकाळी पंतप्रधानांनी मंदिरात लग्न करणाऱ्या इतर जोडप्यांनाही आशीर्वाद दिले आणि मिठाई दिली. पंतप्रधान कलाकारांसह अनेक नवविवाहित दांपत्यांना अक्षता प्रदान करताना काही दृश्यांत दिसत होते.
त्रिप्रायर श्री रामस्वामी मंदिरात दर्शन
त्रिशूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील प्रसिद्ध त्रिप्रायर श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. करुवन्नूर किंवा थिवरा नदीकाठावर हे मंदिर आहे. गुरुवायूर मंदिरात प्रार्थना केल्यानंतर सकाळी ९.४५ च्या सुमारास वलपाड येथील ‘हेलिपॅड’वर मोदी पोहोचले व त्यांनी तेथून काही किलोमीटरवर असलेल्या त्रिप्रायर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
‘मोदी यांचे दौरे भाजपसाठी निरुपयोगीच’
कोझिकोड : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत असलेल्या केरळच्या दौऱ्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात जागा जिंकून आपले खाते उघडण्यास मदत होणार नाही,’ अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला, की भाजप जनतेत फूट पाडण्याचा आणि धर्म-धार्मिक स्थळांवरून राजकारण करत आहे. धर्माची राजकारणाशी सांगड घालत आहेत.