देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं आहे. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावच घेतली आणि खडे बोल सुनावले. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

“इंधनाच्या वाढत्या दरांचं ओझं देशवासियांवर पडू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अबकारी कर कमी केला होता. केंद्राने राज्यांनाही कर कमी करत नागरिकांना याचा फायदा द्यावा असं आवाहन केलं होतं. काही राज्यांना केंद्र सरकारची भावना लक्षात घेत कर कमी केला. पण काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. यामुळे या राज्यांमध्ये इंधनाचे दर इतरांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहेच, मात्र शेजारच्या राज्यांचंही नुकसान करत आहे,” असं सांगताना नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि गुजरातची उदाहरणं दिली.

“नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काही राज्यांनी व्हॅट कमी केला. कर्नाटक आणि गुजरात जवळच्या काही राज्यांनी साडे तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये कमावले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी सर्वांना व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली होती. मी कोणावर टीका करत नसून विनंती करत आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवरील ओझं कायम राहिलं. या राज्यांनी किती महसूल कमावला हे मला सांगायचं नाही. पण आता देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करत लोकांना याचा लाभ दिला पाहिजे,” असा सल्ला यावेळी नरेंद्र मोदींनी दिला.

कोलकाता , हैद्राबाद, चैन्नई, मुंबई, जयपुर येथे इंधनाचे दर जास्त आहेत. दीवदमण मध्ये दर कमी आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा ही विनंती आहे असं मोदींनी सांगितलं.

“करोना संकट अजून पुर्णपणे टळलेलं नाही. आपण इतर देशांच्या तुलनेत परिस्थिती चांगली हाताळली आहे. आता काही देशांमध्ये आकडे वाढत असल्याने सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही राज्यात नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेली असं कुठे आढळून आलेलं नाही. लसीकरणाचा यामध्ये मोटा वाटा आहे. लहान मुलांचे लसीकरण ही आता प्राथमिकता आहे,” असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“तिसऱ्या लाटेत जास्त केसेस असतानाही व्यवहार सुरु ठेवले होते. असंच काम पुढे सुरु राहिलं पाहिजे. संक्रमणाला सुरुवातीलाच रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे,” असं मोदींनी सांगितलं.

“आरोग्य विषयक पायाभूत सुविधा चांगल्या स्थितीत आहेत, पण यापुढे त्या कार्यरत राहतील यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. भारताने करोनाची लढाई ही चांगली लढली आहे. केंद्र आणि राज्य यांनी एकत्रित सामना केला आहे आणि यापुढेही केला पाहिजे. एकत्रित प्रयत्नांमुळे आरोग्यविषयक सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, आर्थिक नियोजनात केंद्र आणि राज्य यांच्या ताळमेळ आवश्यक आहे,” असा सल्ला मोदींनी दिला.

“आणखी एक विनंती आहे. देशात उकाडा वाढत आहे त्यामुळे आत्तापासून हॉस्पिटलचे सेफ्टि ऑडिट करा. तेव्हा संभाव्य दुर्घटनेपासून वाचता येईल,” असं मोदी म्हणाले.