हरसिल (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील बारमाही पर्यटनाचा पुरस्कार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुंदर डोंगराळ राज्यात कोणताही ‘ऑफ सीझन’ नसावा आणि प्रत्येक हंगाम ‘ऑन सीझन’ असावा ज्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात मजबूत होईल, असे प्रतिपादन केले. मुखबा येथील गंगा नदीसमोर प्रार्थना केल्यानंतर हर्सिलमधील एका जाहीर सभेला ते संबोधित करीत होते. पर्यटक जर हिवाळ्यात राज्यात आले तर त्यांना उत्तराखंडची खरी आभा बघायला मिळेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर धामी उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी त्यांना जाणवलेल्या एका भावनेचा उल्लेखही केला. गंगा मातेने त्यांना मुलासारखी मिठी मारली होती आणि त्यामुळेच मुखवा येथे आलो असल्याचे पंतप्रधान म्हणाले. चमोली जिल्ह्यातील माना गावात नुकत्याच झालेल्या हिमस्खलनात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन कॅम्पमधील आठ कामगारांचा मृत्यू झाल्याबद्दलही त्यांनी दु:खही व्यक्त केले.

पर्यटनाबरोबरच रोजगारही सुरू होईल. स्थानिक तरुणांना वर्षभर संधीही मिळेल. एक ‘३६०-डिग्री दृष्टिकोन’ आवश्यक आहे. सध्या मार्च, एप्रिल आणि जूनमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक पर्वतावर येतात, परंतु त्यानंतर त्यांची संख्या कमी होते. बारमाही पर्यटनामुळे उत्तराखंडची आर्थिक क्षमता वाढण्यास मदत होईल.

गावाचा विकास करणार

१९६२ मध्ये जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा सीमावर्ती गाव जाजुंग रिकामे करण्यात आले. आता त्याचे पुनर्वसन आणि विकास करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, केदारनाथ आणि हेमकुंड साहिबसाठी कॅबिनेट समितीने मंजूर केलेल्या दोन प्रमुख रोपवे प्रकल्पांना केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आठ-नऊ तासांचा प्रवास कमी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

घाम तापो पर्यटनचा संदेश

राज्यातील हिवाळी पर्यटनासाठी गढवाली भाषेत ‘घाम तापो पर्यटन’ (सूर्यस्नान पर्यटन) चा संदेश देत हिवाळ्यात, जेव्हा देशाच्या मोठ्या भागावर धुके असते, तेव्हा पर्वत सूर्यप्रकाशाचा आनंद घेतात, असे प्रतिपादन केले. बारमाही किंवा ३६५ दिवसांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या राज्य सरकारच्या दृष्टिकोनाचे त्यांनी यावेळी कौतुकही केले. तसेच केदारनाथ मंदिरापर्यंत होत असलेल्या विकासकामांची माहितीही त्यांनी दिली.

गंगा नदी स्वच्छ करण्याचा मोदींना विसर

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी दावा केला की, ‘नमामि गंगे’ योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीपैकी ५५ टक्के रक्कमही खर्च झाली नाही, हाच पुरावा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गंगा स्वच्छतेसाठी दिलेल्या हमीचा विसर पडला आणि स्वच्छतेच्या नावाखाली फसवणूक केली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा दाखलाही दिला. या योजनेसाठी मार्च २०२६ पर्यंत ४२,५०० कोटी रुपये वापरायचे होते; परंतु डिसेंबर २०२४ पर्यंत केवळ १९,७२१ कोटी रुपयेच खर्च झाले असल्याचे खरगे म्हणाले. या निधीतील ५३ टक्के रक्कम सरकारी उपक्रमातून दान करण्यात आली आहे, असा दावा खरगे यांनी केला आहे.

गंगा देवीची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगा देवीचे हिवाळी निवासस्थान असलेल्या मुखवा मंदिरात वैदिक मंत्रोच्चारात पूजा केली. पारंपरिक वेशभूषा केलेल्या स्थानिकांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी आजूबाजूच्या बर्फाच्छादित शिखरांचे सकाळचे दृश्यही न्याहाळले. मुखवा हे गंगा देवीला समर्पित गंगोत्री मंदिराच्या वाटेवर वसलेले गाव आहे. दरवर्षी हिवाळ्यासाठी दरवाजे बंद झाल्यानंतर देवीची मूर्ती गंगोत्री धाम येथून मुखवा मंदिरात नेली जाते.

Story img Loader