PM Narendra Modi on Formar PM Manmohan Singh: अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या दोन्ही गटांकडून जोरकसपणे आपली बाजू मांडली जात आहे. बुधवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. त्याअनुषंगाने काँग्रेसला लक्ष्य केलं. पण आज राज्यसभेत बोलताना मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यसभेतील ५६ खासदारांचा कार्यकाळ संपत असून त्यानिमित्ताने या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा राज्यसभेत पार पडली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत आभारप्रदर्शन करताना आपली भूमिका मांडली. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. यावेळी मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“लोकसभा दर पाच वर्षांनी नव्या रंगात सजते. पण राज्यसभा दर दोन वर्षांनी एक नवी ऊर्जा प्राप्त करते. त्यामुळे दर दोन वर्षांनी या सभागृहातून सदस्य बाहेर पडताना अनेक चांगल्या आठवणी मागे सोडून जातात”, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“काही सदस्य सभागृह सोडून जात आहेत. असं होऊ शकतं की काही लोक परत येण्यासाठी जात आहेत. तर काही लोक कायमचे जात असतील. मी डॉ. मनमोहन सिंग यांचं विशेष करून स्मरण करू इच्छितो. सहा वेळा या सभागृहात त्यांनी आपले मौलिक विचार मांडले. सभागृह नेता व विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी या सभागृहात खूप मोठं योगदान दिलं आहे. वैचारिक मतभेद अल्पकालीन असतात. पण एवढ्या मोठ्या काळासाठी ज्या प्रकारे त्यांनी या सभागृहाला मार्गदर्शन केलं, देशाला मार्गदर्शन केलं, ते पाहाता जेव्हा केव्हा भारतीय लोकशाहीच्या संदर्भात काही मोजक्या लोकांची चर्चा होईल, त्यात मनमोहन सिंग यांची चर्चा नक्की होईल”, अशा शब्दातं मोदींनी मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले.
‘त्या’ प्रसंगाचा केला उल्लेख!
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत आले त्या प्रसंगाचा उल्लेख केला. “लोकसभेत काही दिवसांपूर्वी मतदानाचा एक प्रसंग होता. कशासाही हे मला आठवत नाही. हे स्पष्ट होतं की या मतदानानंतर विजय सत्ताधाऱ्यांचा होणार आहे. बाजूने व विरोधात असणाऱ्या मतांमध्ये अंतर खूप होतं. पण डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले, मतदान केलं. एक खासदार आपल्या जबाबदाऱ्यांसाठी किती जागृत आहे याचं हे प्रेरणादायी उदाहरण होतं. समिती सदस्यांसाठी जेव्हा मतदान होतं, तेव्हाही ते व्हीलचेअरवर आले. इथे प्रश्न हा नाहीये की ते कोणत्या पक्षासाठी आले होते. मी असं मानतो की ते लोकशाहीसाठी आले होते. त्यामुळे आज मी विशेषकरून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. ते असेच आपल्याला मार्गदर्शन करत राहो, आपल्याला प्रेरणा देत राहो”, असं मोदी म्हणाले.
काय होता तो प्रसंग?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेला प्रसंग गेल्या वर्षी ८ ऑगस्ट २०२३ रोजीचा आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिल्ली सेवा विधेयक सत्ताधाऱ्यांकडून मंजुरीसाठी मांडण्यात आलं होतं. त्या विधेयकावर मतदान करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत आले होते.
विशेष म्हणजे तेव्हा भाजपाकडून या प्रकारावर परखड शब्दांत टीका करण्यात आली होती. मात्र, आज मोदींनी राज्यसभेत मनमोहन सिंग यांच्या या कृतीबाबत “लोकशाहीला ताकद देण्यासाठी ते आले होते” अशा शब्दांत गौरवोद्गार काढले.