मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांचा चपाती बनवण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिल गेट्स आणि शेफ ईटन बर्नथ चपात्या बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेफ ईटन बर्नथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रियाही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
प्रसिद्ध शेफ ईटन बर्नथ यांनी संबंधित व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिलं की, “बिल गेट्स आणि मला एकत्रित भारतीय खाद्यपदार्थ चपाती बनवताना खूप मजा आली. मी नुकताच भारतातील बिहारहून परत आलो आहे. बिहारमध्ये मी एका गहू उत्पादक शेतकऱ्याला भेटलो. तसेच मी “दीदी की रसोई” कँटीनमधील महिलांचं आभार मानू इच्छितो, त्यांच्यामुळे मी चपाती बनवायला शिकलो.”
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बिल गेट्स यांच्या चपाती बनवण्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. मोदींनी संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत’Superb’ असं लिहिलं आहे.
हेही वाचा- “चांगली पोरगी बघा अन्…”, आदित्य ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाडांचं विधान
बिल गेट्स यांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतात सध्या बाजरीचा ट्रेंड सुरू आहे. बाजरी ही आरोग्यासाठी पोषक मानली जाते. बाजरीचे अनेक पदार्थ बनवता येतात, तुम्हीही प्रयत्न करू शकता.” या प्रतिक्रियेसह मोदींनी ‘हसरा इमोजी’ वापरला आहे. मोदी यांची ही कमेंट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.