नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यंकय्या नायडू यांच्या ‘वन-लाइनर’चे कौतुक केले. नायडूंचे ‘वन-लाइनर’ म्हणजे हजरजबाबीपणाचा उत्तम नमुना होते. हे ‘वन-लाइनर’ समोरच्या व्यक्तीला उत्स्फूर्तपणे जिंकून घेण्याचे कसब म्हटले पाहिजे, असेही मोदी म्हणाले. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना सोमवारी वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी निरोप दिला. नायडूंचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात येत आहे.
नायडूंच्या ‘वन-लाइनर’ने सभागृहात खासदारांना अनेकदा गप्प केले आहे. त्यामुळे मोदींनी कटाक्षाने त्याचा उल्लेख केला. ‘नायडूंची प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्यांची भारतीय भाषांबद्दल असलेली आवड. सभापती म्हणून त्यांनी खासदारांना मातृभाषेत बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले’, असे मोदी म्हणाले.
नायडूंनी राज्यसभेच्या कामकाजाचा दर्जा उंचावला, कामकाजातील ७० टक्के वाढ झाली. नायडूंनी नेहमीच सभागृहामध्ये संवादाला प्रोत्साहन दिले. कामकाजाचा दर्जा टिकून राहावा यांसाठी मानके निश्चित केली. त्यांचे हे योगदान उत्तराधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन करत राहील, असे मोदी म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक कामकाजात सातत्याने व्यत्यय आणत असल्याचा संदर्भ देत मोदी यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. कामकाजात व्यत्यय आणणे हा सभागृहाचा अवमान असल्याचे नायडूंचे मत आहे. सरकारने प्रस्ताव आणावेत, त्याला विरोधकांनी विरोध करावा आणि सभागृहाने तो मोडून काढावा, या तत्त्वावर नायडूंनी काम केले, असे मोदी म्हणाले.
‘‘संसदेचे वरिष्ठ सभागृह या नात्याने आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. भारत वेगाने पुढे जात आहे. मी राज्यसभेतील खासदारांना आवाहन करतो की, या सभागृहाची प्रतिमा आणि सन्मान राखला जावा यासाठी सभ्यता, प्रतिष्ठा आणि शिष्टाचार पाळावा’’, अशी राज्यसभेचे सभापती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी अखेरची टिप्पणी केली.
आत्मचरित्रात तरी उत्तरे मिळतील? विरोधकांचा टोला
राज्यसभेत वादग्रस्त कृषी विधेयके अत्यंत गदारोळात मतविभागणी न घेता आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. त्याचा संदर्भ देत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी नायडूंना टोला हाणला! ‘२० सप्टेंबर २०२० रोजी कृषी विधेयके मंजूर केली, पण, त्या दिवशी नायडू अध्यक्षस्थानी नव्हते. इतक्या मोक्याच्या क्षणी ते कसे गैरहजर राहिले? कदाचित, तुम्ही तुमच्या आत्मचरित्रात याचे उत्तर देऊ शकाल, अशी उपहासात्मक टिप्पणी ओब्रायन यांनी केली. नायडूंनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी एका तरी प्रश्नाचे उत्तर द्यावे यासाठी खूप प्रयत्न केले असतील. पण ते होऊ शकले नाही, अशीही कोपरखळी ओब्रायन यांनी मोदींना हाणली. नायडू यांना भाजप विरोधी पक्षात असताना इंधनाच्या किमतींवर प्रभावी भाषण केल्याची आठवणही ओब्रायन यांनी करून दिली. ‘आपल्या विचारसरणी भिन्न असू शकतात आणि माझ्या तुमच्याबद्दल काही तक्रारीही असू शकतात, पण दबावाखाली असतानाही तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली याबद्दल मी तुमचे आभार मानतो’, असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
संसदेचे अधिवेशन चार दिवस आधीच गुंडाळले
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी, नियोजित कालावधी पूर्ण होण्याच्या चार दिवस आधीच गुंडाळण्यात आले. १८ जुलै रोजी सुरू झालेले हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार होते. पण, ९ व ११ अशा दोन्ही दिवशी सुट्टी असल्याने सोमवारी संसद संस्थगित करण्यात आली. या अधिवेशनाच्या काळात नव्या राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींची निवड करण्यात आली. २५ जुलै रोजी नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ देण्यात आली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा ११ ऑगस्ट रोजी शपथविधी होणार आहे. पावसाळी अधिवेशनांमध्ये ७ विधेयके संमत केली गेली.