मणिपूरमधील हिंसाचारावरून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातलं वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष सातत्याने याप्रकरणी चर्चेची मागणी करत आहे. तसेच केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेवर हल्लाबोल करत आहेत. अशातच बुधवारी (२६ जुलै) विरोधी पक्षांनी मणिपूर प्रकरणावरून लोकसभेत अविश्वास ठराव मांडला. त्यासाठी अध्यक्षांची मान्यताही मिळाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०१९ मधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये लोकसभेत सांगितलं होतं की, आपले विरोधक २०२३ मध्ये संसदेत अविश्वास ठराव सादर करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ ७ फेब्रुवारी २०१९ चा आहे. त्यावेळी लोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणानंतर चर्चा सुरू होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विरोधी पक्षांनी २०२३ मध्ये आणखी एक अविश्वास ठराव आणण्यासाठी तयारी केली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या लोकसभेतील परभावाचाही उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मला तुम्हाला (विरोधी पक्ष) शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुम्ही एवढी तयारी करा की, तुम्हाला २०२३ मध्ये पुन्हा एकदा अविश्वास ठराव आणण्याची संधी मिळेल.” यावर समोरच्या बाकावरून आवाज आला, “हा तुमचा अहंकार बोलतोय.” त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे समर्पण (सेवा) आहे. म्हणूनच तुम्ही ४०० वरून ४० वर आलात (४०० खासदारांवरून तुमची संख्या कमी होऊन ४० झाली आहे.) तुम्ही आता कुठे आहात ते पाहा एकदा.

हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस, विरोधक लोकसभेत आक्रमक!

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी बुधवारी मणिपूर हिंसाचारावर संसदेत सरकारविरोधातला अविश्वास ठराव मांडला, ज्याला लोकसभेत मंजुरी मिळाली. लोकसभेचे अध्यक्ष यावर म्हणाले, आपण सर्वांशी बोलून वेळ ठरवू. विरोधी पक्षांनी नियम क्रमांक २६७ अंतर्गत चर्चेची मागणी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून त्यास विरोध सुरू आहे. राज्यसभेच्या सभापतींनी विरोधी पक्षांची नोटीस फेटाळत नियम क्रमांक १७६ अंतर्गत चर्चा करण्याचा प्रस्ताव आधीच मंजूर केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं काम दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi predicted oppositions no confidence motion in 2019 asc