लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर रीतसर लोकसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणाही झाली. यंदा पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षांची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, हंगामी अध्यक्षांनी मतदानाची मागणी फेटाळून लावत आवाजी मतदानावर ओम बिर्ला यांची निवड झाल्याचं जाहीर केलं. मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान लोकसभेत दुर्मिळ असा प्रसंग घडल्याचं पाहायला मिळालं. प्रचाराच्या रणधुमाळीत आणि अगदी संसदेच्या कामकाजादरम्यानही एकमेकांवर परखड टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं लोकसभेत घडलं काय?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. बुधवारी सकाळी उरलेल्या काही खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झाली. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये उपाध्यक्षपदावर असहमती झाल्यानंतर काँग्रेसने केरळमधील खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे १९७६ नंतर पहिल्यांदाच अशी निवडणूक संसदेत पार पडली. आवाजी मतदान प्रक्रियेत हंगामी अध्यक्षांनी ओम बिर्ला यांना विजयी घोषित केलं.

ओम बिर्ला यांची निवड जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरून उठून ओम बिर्ला यांच्या जागेवर गेले. तिथे मोदींनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. त्यांच्यात काही बोलणी सुरू होताच पाठीमागून विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले राहुल गांधी हेदेखील ओम बिर्लांचं अभिनंदन करण्यासाठी आले. त्यांना पाहताच मोदींनी हाताने त्यांना पुढे येण्याची विनंती केली.

१८ व्या लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएकडेच, ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड! काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार का?

राहुल गांधींनी पुढे होत ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्यांना अभिनंदन केलं. यानंतर लागलीच त्यांनी मोदींकडे पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधींकडे बघून हसतमुखाने हस्तांदोलन केलं. यानंतर या दोघांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत सोबत केली. तिथे पुन्हा एकदा आधी मोदींनी आणि त्यांच्यापाठोपाठ राहुल गांधी व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं.

याआधी झाली होती ‘त्या’ गळाभेटीची तुफान चर्चा!

याआधी सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या गळाभेटीची जोरदार चर्चा झाली होती. २० जुलै २०१८ रोजी मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी राहुल गांधींनी लोकसभेत सविस्तर भाषण केलं. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली होती.

भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या जागेवर जाऊन त्यांची गळाभेट घेतली. या प्रसंगाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावर बरेच मीम्सही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व राहुल गांधींमधील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi rahul gandhi hand shake in parliament mansoon session pmw