गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे अखेरचे दोन्ही कल समोर आले आहेत. गुजरातमध्ये भाजपाचे जोरदार मुसंडी मारली असून, आपलाच इतिहासातील विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातमध्ये भाजपाला १५६ जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेसचे केवळ १७ उमेदवार जिंकले आहेत. तर, आम आदमी पक्षाने ( आप ) खाते खोलले असून, ५ जागांवर विजय मिळवला आहे.
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता खालसा झाली आहे. भाजपाला दणाणून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ४० उमेदवार निवडून आले आहेत. तर, भाजपाला २५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ‘आप’ने हिमाचलमध्ये खातेही खोलता आले नाही. हिमाचलमधील पराभवावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं आहे.
गुजरातमधील दैदिप्यमान विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात जनतेला संबोधित केलं. “हिमाचलच्या नागरिकांचा आभारी आहे. हिमाचलमध्ये एक टक्क्यांहून कमी मतांनी आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी एवढ्या कमी मतांनी सरकार बदलेलं नाही. याचा अर्थ जनतेने भाजपाला चांगला प्रतिसाद दिला आहे.”
हेही वाचा : “गुजरातच्या जनतेने ‘रेकॉर्ड’चा ‘रेकॉर्ड’ तोडून नवा इतिहास रचला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
“हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलते. मात्र, मोठ्या अंतराचा फरक असतो. पण, इथे फक्त एक टक्कांचा फरक आहे. परंतु, मी हिमाचलच्या जनतेला आश्वासन देतो, निवडणुकीत आमचा एक टक्क्यांनी पराभव झाला. तरीही हिमाचलच्या विकासासाठी आम्ही १०० टक्के कटिबद्ध आहोत,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.