PM Modi on Donald Trump : अमेरिकेचे माजी अध्यक्ष व अमेरिकेच्या यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (१३ जुलै) पेन्सल्व्हेनिया येथे निवडणूक प्रचाराच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, “माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली आहे, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे.” ट्रम्प भाषण करत असताना गोळ्यांचा आवाज आल्याने त्यांच्या अंगरक्षकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना व्यासपीठाच्या मागे नेलं. त्यामुळे ते बचावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. या हल्ल्यावरून मोदी यांनी चिंता व्यक्त केली. यासह “राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला थारा नाही.” अशा शब्दांत मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

मोदी यांनी म्हटलं आहे की माझे मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन. आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.

हे ही वाचा >> Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार, गोळी चाटून गेल्याने रक्तस्राव; शूटरचा मृत्यू!

नेमकं काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प पेन्सल्व्हेनियामधील प्रचारसभेत बोलत असताना बंदुकीतून गोळी सुटल्याचा आवाज आला. ही गोळी ट्रम्प यांच्या कानला चाटून गेली अन् ते खाली कोसळले. तसेच लोकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र ट्रम्प यांच्या अंगरक्षकांनी लगेच त्यांना घेराव घातला आणि त्यांना व्यासपीठाच्या मागे घेऊन गेले. त्यावेळी ट्रम्प यांच्या कानावरून रक्त ओघळत असल्याचं दिसत होतं. त्या स्थितीतही त्यांनी पुन्हा एकदा उभे राहून एक घोषणा दिली आणि ते तिथून निघून गेले. यावेळी एकूण चार वेळा गोळीबार झाल्याचा आवाज आल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. तसेच हल्लेखोर प्रचारसभेच्या बाजूलाच असलेल्या एका इमारतीत होता अशी माहिती देखील समोर आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi reacts over attack on friend donald trump says deeply concerned asc