पीटीआय, जॉर्जटाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाकाळात तसेच जागतिक समुदायासाठी दिलेले योगदान आणि कॅरिबियन देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी गयाना आणि डॉमिनिका या देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात गयानात असलेल्या मोदी यांना बुधवारी गयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांनी ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ने सन्मानित केले.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी गयानाचे राष्ट्राध्यक्ष अली यांचे आभार मानले. तसेच भारतातील १४० कोटी लोकांची ही ओळख असल्याची भावना या वेळी त्यांनी ‘एक्स’ संदेशातून व्यक्त केली. मोदींनी हा सन्मान भारतीयांना आणि दोन्ही देशांतील लोकांमधील खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वेळी मोदी हा दौरा म्हणजे भारत-गयाना मैत्री अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे म्हणाले.

हेही वाचा : “तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी कंपनीला सांगावं लागेल”, नेटिझन्सचा संताप; सुट्ट्या रद्द करणारी कंपनीची नोटीस व्हायरल!

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गयानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणारे मोदी हे चौथे परदेशी नेते आहेत. याआधी मोदी यांना डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आला. हा पुरस्कार भारतातील १४० कोटी लोकांना समर्पित करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

Story img Loader