देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासाबाबत बोलतानाच विरोधकांवरही टीका केली. आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाल्याची टीका मोदींनी यावेळी केली. तसेच, देशाच्या विकासामध्ये तीन वाईट प्रवृत्ती असल्याचं सांगताना त्यात घराणेशाहीचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गेल्या ७५ वर्षांत काही विकृती…”

“२०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षं साजरी करत असेल, तेव्हा भारत विकसित झाला असेल. हे मी देशाच्या सामर्थ्याच्या जोरावर म्हणतोय. सर्वात जास्त ३० हून कमी वयाच्या युवा शक्तीच्या जोरावर, महिलांच्या जोरावर म्हणत आहे. पण त्यामध्ये काही अडथळे आहेत. काही विकृती गेल्या ७५ वर्षांत देशात घर करून बसल्या आहेत. आपल्या समाजव्यवस्थेचा असा हिस्सा बनल्या आहेत, की कधीकधी आपण डोळे बंद करून घेतो. पण आता डोळे बंद करण्याचा वेळ नाहीये. जर संकल्प पूर्ण करायचा असेल, तर आपल्याला तीन वाईट प्रवृत्तींचा सामना करणं गरजेचं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मोदींनी सांगितल्या तीन वाईट प्रवृत्ती

या तीन वाईट प्रवृत्तींपैकी पहिली प्रवृत्ती म्हणजे भ्रष्टाचार असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. “आपल्या देशाच्या सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचारानं वाळवीप्रमाणे देशाच्या सामर्थ्याला पोखरून काढलं आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती, त्याच्याविरोधात लढा प्रत्येक क्षेत्रात होणं आवश्यक आहे. हा मोदींचा शब्द आहे. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहीन”, असं ते म्हणाले.

“दुसरी अडचण म्हणजे आपल्या देशाला घराणेशाहीनं पोखरून ठेवलं आहे. घराणेशाहीनं देशाला बांधून ठेवलं आहे. त्यामुळे देशाच्या लोकांचे अधिकार हिसकावून घेतले आहेत”, असं ते म्हणाले.

“तिसरी अडचण म्हणजे द्वेषभावना. या द्वेषभावनेनं देशाच्या मूलभूत विचाराला, देशाच्या सर्वसमावेशच चारित्र्याला डाग लावला आहे. उद्ध्वस्त करून ठेवलं आहे”, अशा शब्दांत मोदींनी देशासमोरची तिसरी वाईट प्रवृत्ती नमूद केली.

“आपल्याला या तीन वाईट प्रवृत्तींविरोधात पूर्ण सामर्थ्यानिशी लढायचं आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण. ही आव्हानं आपल्यासमोर आहेत. या गोष्टी आपल्या देशाच्या लोकांमधल्या आकांक्षा दाबून टाकतात. लोकांचं शोषण करतात.आपले गरीब, दलित, मागास, पसमांदा, आदिवासी, महिला.. आपण सगळ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी या तीन वाईट प्रवृत्तींशी मुक्ती मिळवायला हवी. आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात संतापाचं वातावरण बनवायला हवं”, असं मोदी म्हणाले.

“असे लोक फायदा घेत होते, जे जन्मालाही आले नव्हते”

“तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकार भ्रष्टाचारापासून मुक्ततेसाठी प्रयत्न करत आहे. गेल्या ९ वर्षांत जे १० कोटी लोक व्यवस्थेचा गैरफायदा घेत होते, ते मी बंद करून टाकलं. हे १० कोटी लोक असे होते ज्यांचा जन्मच झाला नव्हता. हे लोक मोठे व्हायचे, म्हातारे व्हायचे, दिव्यांग व्हायचे. हे सगळं मी बंद केलं आहे”, अशी माहिती यावेळी मोदींनी दिली.

घराणेशाहीवरून विरोधकांना अप्रत्यक्ष टोला

दरम्यान, यावेळी बोलताना मोदींनी घराणेशाहीवर टीका केली. “आज देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला मजबुती देऊ शकत नाही. ती म्हणजे घराणेशाहीवादी पक्ष. त्यांचा मूलमंत्र आहे पार्टी ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली. त्यांचा जीवनमंत्रच हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाकडून व कुटुंबासाठी चालावा. घराणेशाही प्रतिभेची शत्रू असते. त्यामुळे घराणेशाहीचं उच्चाटन देशाच्या लोकशाहीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi red fort speech on independence day program in delhi targets congress pmw