तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आणि ती न शिकणे ही आपल्या दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीतील खूप मोठी खंत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा सांगितले. आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात त्यांनी तमिळ साहित्य आणि कवितांचे कौतुक केले आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना अपर्णा रेड्डी यांनी विचारले होते की, मुख्यमंत्री व पंतप्रधान या राजकारणातील दोन महत्वाच्या भूमिका निभावतानाच्या दीर्घ प्रवासात कोणत्या गोष्टी करायचे राहून गेले असे आपल्याला वाटते आहे?

“मी या प्रश्नाबद्दल विचार केला आणि मला असे वाटते की – जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ मी शिकू शकलो नाही ही खेदाची गोष्ट आहे. ही एक सुंदर भाषा आहे आणि जगभरात लोकप्रिय आहे. बर्‍याच लोकांनी मला तमिळ साहित्य, तमिळ कवितांबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल सांगितले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदींनी अलीकडच्या काळात आपल्या भाषणांमध्ये तमिळ भाषेचा वापर केला होता आणि संसदेत तमिळ श्लोकांचा वापरही केला होता. २०१८ मध्येही त्यांनी जाहीरपणे तमिळ बोलू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी तमिळ तत्त्ववेत्ता-कवी कानियान पुंगुंद्रनार यांचे विचार नमूद केले होते.