नवी दिल्ली : चीनसह काही देशांमध्ये पुन्हा करोना फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २४ तारखेपासून परदेशातून आलेल्या २ टक्के प्रवाशांची क्रमविरहित करोना नमुना चाचणी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील करोनाची सद्य:स्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची सज्जता, लसीकरण मोहिमेची परिस्थिती, करोनाचे उत्परिवर्तित विषाणू आणि त्याच्या परिणामांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी करून करोनाबाबत उपाययोजनेमध्ये आत्मसंतुष्ट राहू नका आणि सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांमध्ये सुधारणा करा, अशी सूचना राज्यांना केली. नागरिकांनी करोनाबाबत योग्य जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले असून, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना केली आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात, नववर्ष स्वागतावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना अधिक सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अधिक धोका असलेल्या आणि वयोवृद्ध नागरिकांना करोना लशीच्या वर्धक मात्रेमुळे (बूस्टर डोस) फायदा होईल, असे ते म्हणाले. करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारांचा लवकर छडा लागण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या वाढविण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले. करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.
सर्व प्रवाशांची तापमान तपासणी
नागपूर : राज्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तापमान तपासणी (थर्मल टेिस्टग) केली जाईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर राज्य सरकार योजत असलेल्या उपायांची सावंत यांनी माहिती दिली. राज्यात ओमायक्रॉनच्या ‘बीएफ-७’ या उत्परिवर्तित विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.