गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरतमध्ये पार पडलेल्या भाजपाच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ‘दहशतवाद्यांचे हितचिंतक’ म्हणत २००८ मधील बाटला हाऊस चकमकीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मोदींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “बाटला हाऊसमध्ये झालेली चकमक दहशतवादी कृत्य होतं. पण काँग्रेस नेत्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले”, असे मोदी यांनी म्हटले आहे.
“गुजरातच्या नव्या पिढीने अहमदाबाद आणि सुरतचे साखळी बॉम्बस्फोट पाहिलेले नाहीत. जे दहशतवाद्यांचे हितचिंतक आहेत, त्यांच्याबद्दल मी त्यांना सावध करू इच्छितो”, असे मोदी सुरतमधील सभेत म्हणाले आहेत. “सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी काँग्रेस दहशतवादाला आपली वोट बँक मानते. काँग्रेसच्या राजवटीत दहशतवाद शिगेला पोहोचला होता. गुजरात नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलं आहे. सुरत आणि अहमदाबादेत झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. तेव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. या सरकारला आम्ही दहशवादावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी मलाच लक्ष्य केले”, असा घणाघात मोदींनी केला आहे. दहशतवाद संपवण्यासाठी भाजपा सरकार ठोस पाऊलं उचलत असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.
“बाटला हाऊस चकमकीदरम्यान रडारड करत काँग्रेस नेते दहशवाद्यांचे समर्थन करत होते. दहशतवाद काँग्रेससाठी वोट बँक आहे. आता केवळ काँग्रेसच नाही, तर अनेक असे पक्ष उदयास आले आहेत, जे शॉर्टकट आणि तुष्टीकरणावर विश्वास ठेवतात”, असे मोदी यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये येत्या १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ९९ जागांवर भाजपानं विजय मिळवला होता. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. याही निवडणुकीत विजयाची मालिका कायम ठेवत १४० हून अधिक जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे. येत्या ८ डिसेंबरला या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.